मालवण /-

रेवंडीतील ग्रामस्थांना केलेल्या शब्दाप्रमाणे याठिकाणी उभारण्यात आलेल्या बीएसएनएलच्या टॉवरचे लोकार्पण रविवारी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते तसेच खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. रेवंडीतील ग्रामस्थांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून या कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. गावातील अन्य प्रश्न देखील महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मार्गी लावले जातील अशी ग्वाही पालकमंत्र्यांसह शिवसेनेच्या नेत्यांनी यावेळी दिली. गावातील वाळू व्यावसायिकांची समस्या नेत्यांसमोर मांडून ही समस्या दूर केल्यास संपूर्ण गाव शिवसेनेच्या बाजूने उभा राहील ग्वाही माजी सरपंच युवराज कांबळी यांनी दिली. दरम्यान, रेवंडी ग्रामस्थांना दिलेले सर्व शब्द आम्ही पाळू. ग्रामस्थांनीही आम्हाला दिलेले वचन पाळावे, असे पालकमंत्री उदय सामंत यानिमित्ताने म्हणाले.
मालवण तालुक्यातील रेवंडी भद्रकाली मंदिर नजिक उभारण्यात आलेल्या बीएसएनएल टॉवरचे लोकार्पण रविवारी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, नागेंद्र परब, संग्राम प्रभुगावकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुका प्रमुख गणेश कुडाळकर, शहर प्रमुख बाबी जोगी, सरपंच प्रिया कांबळी, उपसरपंच शामसुंदर तळाशीलकर, अमोल वस्त, माजी सरपंच तथा देवस्थान कमिटी अध्यक्ष युवराज कांबळी, विजय कांबळी, जयराम कांबळी आदींसह अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देवस्थान कमिटीच्या वतीने यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी गावातील रस्त्याचा प्रश्न सोडवण्या बरोबरच अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page