दोडामार्ग-बांदा रस्ता बनला मृत्यूचा सापळा;डेगवे परिसरात मोठे खड्डे;अपघातांच्या प्रमाणात वाढ..

दोडामार्ग-बांदा रस्ता बनला मृत्यूचा सापळा;डेगवे परिसरात मोठे खड्डे;अपघातांच्या प्रमाणात वाढ..

बांदा/०६सप्टेंबर

बांदा-दोडामार्ग महामार्ग सद्यस्थितीत प्रवासी, वाहनचालकांसाठी तरी मृत्यूचा सापळाच बनला आहे. संपूर्ण महामार्गावर मोठाले खड्डे पडल्याने खड्डे वाचविण्याच्या नादात वाहनचालकांना अपघातांना सोमोरे जाण्याचे प्रकार घडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन तात्काळ तात्पुरती तरी उपाययोजना करून मार्ग निर्धोक करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.

बांदा-दोडामार्ग रस्त्यावर जागोजागी मोठाले खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे हा मार्ग अपघातांचा मार्ग म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. जड वाहने व दुचाकी चालवणे म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारखा अनुभव वाहनचालकांना येत असल्याचे काही चालकांनी सांगितले. सदर मार्गावर वाहनांची रात्रंदिवस वर्दळ असते. दोन दिवसांपूर्वी डेगवे परिसरात याच मार्गावर एका दुचाकीस्वाराचा खड्डे चुकविताना अपघात झाला. सुदैवाने वाहनावर नियंत्रण मिळविल्याने किरकोळ दुखापत झाली. दररोज अपघाताच्या घटना घडत असताना खड्डे दुरूस्तीकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वाहनचालक, प्रवासी तसेच नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

धोकादायक बनलेल्या सदर मार्गाची रस्ते विभागाने तातडीने दुरूस्ती करावी व खड्ड्यांमुळे कोणताही अपघात झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाने घ्यावी. तसेच दुर्लक्षित झालेल्या रस्त्याकडे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीने पाहून मार्ग निर्धोक करण्याची मागणी प्रवासी, वाहनचालक, नागरिकांमधून होत आहे.

बांदा ते डेगवे दरम्यान रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली असून महामार्ग जीवघेणा ठरत आहेत. रस्त्यावरील जीवघेणे खड्डे चुकविण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटते अन् अपघात होतात, अशी प्रतिक्रिया येथून प्रवास करणारे पाडलोस येथील राजाराम ऊर्फ पपी गावडे यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..