लोकप्रतिनिधी, पक्ष यांच्या नाकर्तेपणाला कंटाळून करण्यात आला अभिनव उपक्रम!
कुडाळ /-
सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार निवेदन देऊनही होणारे दुर्लक्ष, खड्डे बुजवण्यासंदर्भात असलेली राजकीय अनास्था बघून शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने कुडाळ – मालवण रस्त्यावर खड्डे भरा अभियान करण्यात आले. या मार्गावर कुडाळ जवळील नाबरवाडी परिसरात असलेले खड्डे भरण्यात आले.
सर्वसामान्य जागरूक नागरिक म्हणून आपले सामाजिक कर्तव्य बनते की आपणच पुढाकार घेऊन काहीतरी कृती करणे अपेक्षित आहे. केवळ चर्चा करून, निवेदन देऊन, राजकीय आरोप करून हा प्रश्न सुटणार नाही. सामान्य जनतेला जो प्रवासा दरम्यान त्रास होत आहे, तो व्यक्त करण्यासाठी आजचे अभियान केल्याचे शिवप्रेमी सिंधुदुर्ग च्यावतीने सांगण्यात आले.
राजकारण बाजूला ठेवून राजकीय पक्षांनी रस्त्याच्या झालेल्या अवस्थेसंदर्भात कृती करावी आणि प्रशासनाने लवकरात लवकर खड्डे बुजवावे, असे आवाहन शिवप्रेमींच्यावतीने करण्यात आले. यावेळी सर्वश्री गुरुदास प्रभू,ओमकार वाळके, राज भेंडे, विकी थोपे, साईश नाबर, अक्षय प्रभू, ओमकार मडवळ, गणेश कारेकर, दिनेश साळुंखे, किरण कुडाळकर, वसीम शेख, देवेश रेडकर, रमाकांत नाईक आदी उपस्थित होते.