आचरा, निवती बंदरात २४ तास सुरक्षारक्षक राहणार कार्यरत..
मालवण /-
परप्रांतीय ट्रॉलरचे अतिक्रमण रोखण्यासाठी अखेर एक गस्तीनौका दाखल झाली आहे. माजी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळेच ही गस्तीनौका उपलब्ध झाली असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांनी दिली.
दरम्यान अनधिकृत मासेमारी होणाऱ्या आचरा व निवती बंदर येथे उद्यापासून २४ तास सुरक्षारक्षकाची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त श्री. भादुले यांनी दिली.
किनारपट्टीवर बेकायदेशीरपणे हायस्पीड बोटींचा वावर वाढल्यानंतर आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत, माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांचे लक्ष वेधले होते. यामुळे शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात आल्यानंतर गस्तीनौका उपलब्ध झाली आहे. या गस्तीनौकेबरोबरच मत्स्य व्यवसाय विभागाचे सुरक्षा रक्षक निवती आणि आचरा बंदर येथे कार्यरत असणार आहेत. जेणेकरून टोकन घेऊन जाणारी बोट ही अधिकृत आहे, की बेकायदेशीर तसेच अनधिकृत मासेमारी सुरू आहे काय, किनाऱ्यावर येणारी मासळी कोणत्या बोटीतून आली, याचीही माहिती उपलब्ध होणार आहे. पारंपरिक मच्छीमारांची यासंदर्भात अनेक वर्षांची मागणी आज पूर्ण झाल्याबद्दल श्री. जोगी यांनी समाधान व्यक्त केले आहे