बांदा /-
बांदा-शिरोडा मार्गावरून प्रवास करणाऱ्या एका दुचाकीस्वाराची पाडलोस डोंगराचीकोंड येथे बिबट्याने झुडपातून अचानकपणे समोर येत वाट अडवली. काही वेळ भयभीत झालेल्या दुचाकीस्वाराने कसाबसा आपला जीव वाचवत केणीवाडा ग्रामस्थांना याची माहिती. दिली. सुदैवाने आपला जीव वाचला असून ग्रामस्थांनी सावध रहावे असे सांगितले. सदर घटना बुधवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास घडली.
बांद्याहून शिरोड्याच्या दिशेने जाणाऱ्या एका अनोळखी दुचाकीस्वाराला पाडलोस डोंगराचीकोंड येथे बिबट्याचे दर्शन झाले. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झुडपांतून बिबटा अचानक रस्त्यावर आला. गाडीचा हॉर्न वाजवूनही बिबट्या वाट सोडण्याचे नाव घेत नव्हता. काही वेळ तर असे वाटले की आपल्यावर बिबट्या आता हल्ला करणार मात्र सुदैवाने बिबट्याने तेथून केणीवाड्याच्या दिशेने पळ काढल्याने आमचा जीव वाचल्याचे त्या प्रवाशांनी युवासेना मळेवाड जि.प.विभागप्रमुख समीर नाईक यांना सांगितले.
चार दिवसांपूर्वी साळगावकर यांच्या बागेत कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला केला होता. याची दखल घेत तात्काळ समीर नाईक यांनी अन्य ग्रामस्थांना घेऊन त्या ठिकाणी काही वेळ पाहणी केली मात्र बिबट्या दिसला नसल्याचे सांगितले. तरी देखील ग्रामस्थांनी अशा बिबट्यापासून सावध राहण्याचे आवाहन समीर नाईक यांनी केले.