मालवण /-

मालवण पालिकेची अवस्था आंधळं दळतय आणि कुत्रं…. अशी झाली आहे. नगराध्यक्षांचा प्रशासनावर कोणताही अंकुश नाही. जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न, समस्या सोडविण्यात ते अपयशी ठरले असल्याची टीका उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
पालिकेच्या उपनगराध्यक्ष दालनात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी गणेश कुशे उपस्थित होते.
श्री. वराडकर म्हणाले, शहरात भटके कुत्रे, मोकाट जनावरांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत लेखी निवेदन देऊनही कोणतीही कार्यवाही अद्यापपर्यंत नगराध्यक्ष किंवा मुख्याधिकाऱ्यांकडून झालेली नाही. दोन दिवसांपूर्वी कणकवली शहरातील एका दुकानात जशी आग लागली तसाच एकदा मोठा प्रसंग शहरात घडल्यास आपल्याकडे अग्निशमन आहे का ? की लागलेली आग पालिका बादलीतून पाणी मारून विझवणार आहे ? एक वर्ष अग्निशमन निर्लेखीत करूनही पुढील कोणतीही कार्यवाही का झाली नाही असा प्रश्नही वराडकर यांनी उपस्थित केला.
पालिकेने नवीन सक्शन वाहन खरेदी करून एक वर्ष उलटले नसताना ते नादुरुस्त बनले. आता सावंतवाडीतून गाडी भाड्याने आणण्यामागे नेमके कोणते अर्थकारण आहे ? तीन वर्षांपूर्वी शहरातील कचरा वाहतुकीसाठी खरेदी करण्यात आलेली वाहने आता खासगी गॅरेजमध्ये उभी आहेत. भाडे तत्वावर ट्रॅक्टर मागवून कचऱ्याची उचल केल्याचा दिखावा केला जात आहे. हा भाड्याने घेतलेला ट्रॅक्टर कोणाचा ? यामागेही अर्थकारण आहे का ? असाही प्रश्नही वराडकर यांनी उपस्थित केला. कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात एलईडी दिवे बसविण्यात आल्या. मात्र, अनेक पथदिवे बंद आहेत. याबाबत वेळोवेळी आवाज उठवूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. अनेक रस्ते आज अंधारात आहेत. अशावेळी पथदिवे देखभालीचे काय झाले ? असा प्रश्नही श्री. वराडकर यांनी उपस्थित केला आहे.
लोकप्रतिनिधीना स्वखर्चाने पथदिवे दुरुस्ती करण्याची वेळ नगराध्यक्ष व प्रशासनाने आणली आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे नगराध्यक्ष देणार काय ? नगराध्यक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असेही श्री. वराडकर यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page