तणावयुक्त जगात मनःशांतीचा शोध’ या विषयावर ‘दक्षिण आशियाई वैद्यकीय विद्यार्थी संघटने’द्वारे ‘वेबिनार’ !

सिंधुदुर्ग /-

‘शाश्‍वत आनंद आणि शांती पैशांनी विकत मिळू शकत नाहीत, तर ती एखाद्या आध्यात्मिक उन्नतांच्या मार्गदर्शनानुसार नियमितपणे स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबविणे, सात्त्विक जीवनशैली अंगिकारणे आणि स्वतः साधना करणे या त्रिसूत्रींद्वारेच मिळू शकते. त्यासाठी स्वत:च्या उन्नतीच्या दृष्टीने आजीवन समर्पितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. जर एखाद्याने वैश्‍विक तत्त्वांनुसार प्रामाणिकपणे साधना केली, तर योग्य वेळी आपण आपल्या मनाच्या पलीकडे जाऊ शकतो किंवा आपल्यातील प्रत्येकामध्ये असणार्‍या ईश्‍वरी तत्त्वाचा अनुभव घेऊ शकतो. यालाच परमानंद किंवा आनंदाचा सर्वोच्च बिंदू म्हणतात, जो कशावरही अवलंबून नसतो’, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या डॉ. नंदिनी सामंत यांनी केले. ‘दक्षिण आशियाई वैद्यकीय विद्यार्थी संघटने’च्या (SAMSA) वतीने आयोजित ‘तणावयुक्त जगात मनःशांतीचा शोध’ या विषयावरील ‘वेबिनार’मध्ये त्या बोलत होत्या. यामध्ये डॉ. नंदिनी सामंत यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी केलेले संशोधनही मांडले. या ‘वेबिनार’च्या संयोजन ‘दक्षिण आशियाई वैद्यकीय विद्यार्थी संघटने’च्या खजिनदार आणि ‘मेंटॉर’ डॉ. श्रिया साहा यांनी पाहिले.

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे जगविख्यात वैद्यकीय संमोहनतज्ञ आहेत. त्यांना २३ वर्षे एक ‘डॉक्टर’ म्हणून वैद्यकीय व्यवसायाचा, भारत आणि इंग्लंड येथे ५१ वर्षे मानसशास्त्राच्या संशोधनाचा आणि ३९ वर्षे आध्यात्मिक संशोधनाचा अनुभव आहे. डॉ. नंदिनी सामंत यांनी आरंभी ‘तणाव का येतो ?’, याविषयी उहापोह केला. त्यानंतर त्यांनी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया आणि व्यक्तिमत्त्वातील दोष दूर करून त्यांचे गुणांमध्ये रुपांतर करण्यासाठी ही प्रक्रिया कशी राबवायची याविषयी सांगितले. अध्यात्म आणि सात्त्विक जीवनशैली यांमुळे तणाव कसा दूर होतो, याविषयीही त्यांनी अवगत केले. त्यांनी काही ‘केस स्टडी’च्या माध्यमातून ‘जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यसाठी स्वभावदोष निर्मूलन कसे करायचे’ याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

*या ‘वेबिनार’साठी १४ देश आणि भारतातील २४ राज्ये येथून एकूण १,१६८ जणांनी नोंदणी केली होती*. ‘झूम’ आणि ‘यू-ट्यूब’ या माध्यमांतून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. ‘यू-ट्यूब’द्वारे आतापर्यंत ११ हजारांहून अधिक जणांनी हा ‘वेबिनार’ पाहिला आहे. या वेबिनारमध्ये उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. उपस्थितांपैकी ६८.४ टक्के जणांनी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया, साधना आणि सात्त्विक जीवनशैली हे तिन्ही विषय आवडल्याचे सांगितले, तर ९५.६ टक्के जणांनी ‘आनंदी जीवनाच्या प्राप्तीच्या दृष्टीकोनातून हा ‘वेबिनार’ आम्हाला साहाय्यभूत ठरेल’, अशा भावना व्यक्त केल्या. ९१.२ टक्के जणांनी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ‘स्वभावदोष निर्मूलना’विषयी घेण्यात येणार्‍या आगामी कार्यशाळांना उपस्थित रहाण्याची आणि ही प्रक्रिया अंगिकारण्याची इच्छा दर्शवली.
संशोधन विभाग, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय,
संपर्क : 95615 74972

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page