मालवण /-
ओ.बी.सी प्रवर्गाच्या विविध मागण्यांसाठी ओ.बी.सी समन्वय समितीच्यावतीने राज्यभरात निदर्शने करण्यात आली. या पार्श्वभूमीवर ओ.बी.सी संघर्ष समन्वय समिती मालवण तालुक्याच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून विविध मागण्यांचे निवेदन तहसील प्रशासनाला सादर करण्यात आले.
मराठा समाज ओबीसीमध्ये समावेश करण्याची मागणी करीत आहे, त्यांचे ओबीसीकरण करू नये, महाराष्ट्रातील बहुप्रतिक्षित सरळ सेवा मेगा भरती ताबडतोब सुरू करावी, सार्वत्रिक जनगणना जातनिहाय होण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, तशी न झाल्यास राज्यपातळीवर जातनिहाय जनगणना करावी, आदिवासी बहुल ८ जिल्ह्यातील कमी केलेले ओबीसी आरक्षण पूर्ववत करावे, महाज्योती या प्रशिक्षण संस्थेसाठी ५०० रुपये कोटीची त्वरीत तरतूद करावी व तिला स्वायत्तता द्यावी, थकित शिष्यवृत्ती ताबडतोब देण्यात यावी व ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे या शैक्षणिक वर्षापासून सुरू करावी अशा मागण्या यावेळी ओबीसी संघर्ष समितीकडून निवेदनाद्वारे करण्यात आल्या. याबाबतचे निवेदन पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी ओ. बी. सी संघर्ष समन्वय समितीचे तालुका संघटक महेश अंधारी तालुकाप्रमुख समन्वय रवींद्र तळाशीलकर, सुनिल परुळेकर, डॉ. विवेक रायकर, आनंद आचरेकर, श्रीकृष्ण तळवडेकर, वि. के. चव्हाण, संतोष बुडेकर, सुरेश नेरुरकर, दिपक शिंदे, राजन आचरेकर, डॉ. प्रमोद कोळंबकर आदी उपस्थित होते.