मालवण /-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असली तरी पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या वॉटरस्पोर्ट, स्कुबा डायविंग, स्नॉर्कलिंग, आणि प्रवासी जल वाहतुकीला शासनाने अद्याप परवानगी दिलेली नसतानाही गेले दोन दिवस मालवण दांडी आणि चिवला बीचच्या समुद्रात शासनाचे मनाई आदेश धुडकावून बेकायदेशीर पणे वॉटरस्पोर्ट आणि स्नॉर्कलिंग, स्कुबा डायविंग सुरू करणाऱ्यांवर कालपासून पासून सुशेगात असणाऱ्या बंदर विभागाला आज अखेर कारवाईचा बडगा उचलावा लागला. बेकायदेशीरपणे वॉटरस्पोर्ट आणि स्नॉर्कलिंग आणि स्कुबा डायविंग करणाऱ्या तिघा व्यावसायिकांवर बंदर विभागाने कारवाई करत १४ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे दरम्यान, बेकायदेशीर सुरू असलेली जलक्रीडा, स्कुबा डायविंग स्नॉर्कलिंग तातडीने बंद करावे अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा मालवण बंदर निरीक्षक सौ. सुषमा कुमठेकर यांनी नोटीसीद्वारे दिला आहे.
कोरोनामुळे लागू असलेले लॉकडाऊन शिथिल होऊन अनलॉक सुरू झाल्यावर मालवणात गेल्या चार दिवसात गोवा व इतर ठिकाणाहुन येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढत चालला आहे. पर्यटक येत असले तरी येथील पर्यटकांचे मनोरंजनाचे मुख्य आकर्षण असणारे वॉटरस्पोर्ट, स्कुबा डायविंग, जलवाहतूक आदी व्यवसाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चालू करण्याबाबत शासनाकडून अद्याप कोणतेही आदेश नसताना मालवणात दांडी व चिवला बीच येथील काही व्यावसायिकांनी आलेल्या पर्यटकां साठी कालपासून वॉटरस्पोर्ट, जलवाहतूक सुरू केल्याचा प्रकार समोर आला आहे.
यावर्षी मार्च महिन्यात कोरोना महामारीमुळे लागू झालेल्या लॉकडाऊन मुळे गेले आठ महिने मालवणातील स्कुबा डायविंग व वॉटरस्पोर्ट व्यवसाय ठप्प आहे. लॉकडाऊन शिथिल होऊन अनलॉक प्रक्रिया सुरू होऊन काही व्यवसायांना परवानगी देण्यात आली तसेच जिल्हा व राज्यांच्या सीमा प्रवासासाठी खुल्या करण्यात आल्या. मात्र स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, वॉटरस्पोर्ट व बोटिंग आधी कोणतेही व्यवसाय सुरू करण्याबाबत शासनाने परवानगी दिलेली नाही. दुसरीकडे गेल्या चार दिवसांपासून मालवणात गोवा, कोल्हापूर व इतर ठिकाणाहून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. सलग सुट्ट्यांमुळे काल मालवणात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले असताना त्यांच्यासाठी मालवण, दांडी व चिवला बीच येथील काही पर्यटन व्यवसायिकांनी परवानगी नसताना देखील बेकायदेशीरपणे वॉटरस्पोर्ट व जल वाहतूक सुरू केली. काल व आज अनेक पर्यटकांनी या वॉटरस्पोर्टचा आनंदही लुटला.
गेले दोन दिवस बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या या वॉटरस्पोर्ट बाबत डोळेझाक करणाऱ्या मालवणच्या बंदर विभागाने आज कारवाईचा बडगा उचलला. बेकायदेशीर पणे वॉटरस्पोर्ट सुरू केल्याप्रकरणी तिघांकडून बंदर विभागाकडून दंड वसूल करण्यात आल्याची माहिती बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर यांनी दिली
दरम्यान, या तिघांनाही बंदर विभागाने नोटीस बजावली आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून सर्व जलप्रवासी वाहतूक व जलक्रीडा प्रकार बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे बेकायदेशीरपणे सुरू असलेले जलक्रीडा व जलवाहतुक बंद करावी, अन्यथा कायदेशीररित्या कारवाई केली जाईल,अशा आशयाची नोटीस दिल्याची माहिती मालवण बंदर निरीक्षक सौ. सुषमा कुमठेकर यांनी दिली आहे.