राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात सर्वजण सुखरूप

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात सर्वजण सुखरूप

कोल्हापूर /-

काही दिवसांपूर्वीच भाजपातून राष्ट्रवादीत दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली. अमळनेरवरून जळगावकडे येत असताना गाडीचं टायर फुटल्यानं हा अपघात झाला. सुदैवानं यात एकनाथ खडसे यांच्यासह सर्वजण सुखरूप आहेत. त्याचबरोबर कुणालाही दुखापत झालेली नाही. एकनाथ खडसे यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

एकनाथ खडसे हे आज (१ नोव्हेंबर) अमळनेर येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते गाडीने जळगावकडे येत होते. धरणगाव जवळ असतानाच अचानक गाडीचे टायर फुटले. गाडीचा वेग कमी असल्यानं व चालकाने प्रसंगावधान दाखवल्यानं मोठी दुर्घटना टळली. या गाडीत एकनाथ खडसे यांच्यासह काही कार्यकर्तेही होते. सगळे जण सुखरूप आहेत. एकनाथ खडसे यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली.*

*“आज अमळनेरहून जळगावकडे येताना धरणगाव नजिक माझ्या गाडीला किरकोळ अपघात झाला. गाडीचा वेग कमी असल्याने आणि चालकाच्या प्रसंगावधाने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व सुखरूप आहोत. कोणालाही इजा झालेली नाही,” अशी माहिती खडसे यांनी दिली.*

*मागील काही महिन्यांपासून भाजपातील नेतृत्वावर नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांनी पक्षाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानं राष्ट्रवादीला उत्तर महाराष्ट्रात बळ मिळालं आहे. त्याचबरोबर त्यांना राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर पाठवण्यात येणार असल्याची चर्चाही सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.*

अभिप्राय द्या..