मालवण /-

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या तालुकाध्यक्षपदी अध्यक्षपदी सामाजीक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांची आज नियुक्ती जाहीर करण्यात आली. त्याचबरोबर जिल्ह्यातील पहिल्या बॉम्बे ब्लड ग्रुप रक्तदाता असलेल्या शहरातील पंकज गावडे याचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
येथील एएसडी-८६ सोशल फाउंडेशन आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने धुरीवाडा येथील संस्कार सभागृहात आज कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, एएसडी ८६ सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष हरी चव्हाण, पंढरीनाथ आचरेकर, किशोर नाचणोलकर, रवीकांत चांदोस्कर, श्री. शिरोडकर, उद्धव गोरे यांच्यासह दोन्ही संस्थांचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी श्री. तेंडोलकर यांनी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्यावतीने राबविल्या जाणार्‍या विविध उपक्रमांची माहिती दिली. रक्तगटाच्या विविध प्रकाराची माहिती देत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी जगातील दुर्मिळ अशा बॉम्बे ब्लड ग्रुप या रक्तगटाची माहिती दिली. बॉम्बे ब्लड ग्रुपचा शोध कधी व कसा लागला. या रक्तगटाच्या दात्यांचे जगभरात असलेले महत्त्व विषद केले. या रक्तगटाचा जिल्ह्यातील पहिला रक्तदाता असलेल्या शहरातील रेवतळे येथील पंकज गावडे याची घोषणा त्यांनी यावेळी केली. यावेळी दोन्ही संस्थांच्यावतीने पंकज गावडे याला शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
महिलांचे संघटन तसेच विविध सामाजीक उपक्रम राबवून जिल्ह्यात स्वराज्य महिला सामाजीक, सांस्कृतिक संस्थेने आपला वेगळा आदर्श निर्माण केला आहे. रक्तदानात महिलांनीही आता पुढाकार घेत आहे. या संस्थेच्या कार्याची दखल घेत सामाजीक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांची सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या तालुकाध्यक्षपदी निवड जाहीर केली. यावेळी सौ. खोत यांचाही दोन्ही संस्थांच्यावतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सौ. खोत म्हणाल्या, बॉम्बे ब्लड ग्रुप नावाचा रक्तगट असतो हे आजच पहिल्यांदा सर्वांना समजले. शिवाजी महाराजांच्या या भूमित अशा दुर्मिळ रक्तगटाचा रक्तदाता आणि तो ही जिल्ह्यातील पहिला रक्तदाता मालवणात आहे हे सर्वांचे भाग्य आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. त्यामुळे याचे महत्त्व ओळखत महिलांनीही पुढाकार घेत आपले योगदान देणे गरजेचे बनले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page