दोडामार्ग/ –

शासन सर्व काही करेल या आशेवर न राहता समाजाचे आपणही काही देणं लागतो हे समाज ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा व या ऋणातून मुक्त व्हावे यामुळेच समाजसेवा घडून समाजातील दुर्बल घटकांना त्याची मदत होईल असा आशावाद सामाजिक कार्यकर्ते विवेकानंद नाईक यांनी दोडामार्ग येथे “शववाहिका लोकार्पण” सोहळ्यात केला. श्रीम सुशीलाबाई मेमोरियल ट्रस्ट तर्फे दोडामार्ग तालुक्यात प्रथमच शववाहिका उपलब्ध करून देण्यात आली. लोकांची कठीण प्रसंगी होणारी गैरसोय यामुळे दूर होणार आहे. तर ही रुग्णवाहिका दोडामार्ग तालुक्यासाठी उपलब्ध असेल.
यापूर्वी अनेक पक्षाचे पदाधिकारी, शहरातील नागरिक तसेच काही वाहन चालक मृत झालेल्यांचे शव आपल्या गाडीतून नेत होते मात्र एखादा अपघात घडल्यास मात्र मृतदेह नेताना अडचणी येत होत्या मात्र ही अडचण आता या शववाहिकेमुळे दूर होणार आहे.दोडामार्ग शहरातील स्वीकृत नगरसेवक राजू प्रसादी, मनोज पार्सेकर, तसेच इतर युवकांच्या मागणीला मान देत ही शववाहिका विवेक नाईक यांनी उपलब्ध करून दिली. यावेळी या वाहिकेच्या चाव्या या युवकांकडे प्रदान करण्यात आल्या. ही शववहिका कोणत्याही वेळी उपलब्ध असेल व त्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू असे यावेळी या युवकांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर तहसीलदार अरुण खानोलकर, पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, नायब तहसीलदार एन एन देसाई, प स सदस्य व शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष प्रविण गवस, डॉ ज्ञानेश्वर एवळे, डॉ विराज नाईक, डॉ सुहास कुलकर्णी आदी उपस्थित होते.
सर्व उपस्थितांनी विवेक नाईक यांच्या या उपक्रमाचे कौतुक करताना दोडामार्गच्या खऱ्या गरजेची पूर्तता केल्याबद्दल आभार मानले तर विवेक नाईक यांनी याही पुढे “सुशीलाबाई मेमोरीयल ट्रस्ट” तर्फे समाजोपयोगी काम करू असे सांगताना मिनी अग्निक्षमन वाहन देण्याचा मनोदय व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापक संदीप गवस यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page