आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याच्या यादीत सिंधुदुर्गातील खारेपाटण जि. प. केंद्र शाळेचा समावेश..

आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याच्या यादीत सिंधुदुर्गातील खारेपाटण जि. प. केंद्र शाळेचा समावेश..

कणकवली /-

मार्च २०२० मध्ये पार पडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा केल्या नुसार शालेय शिक्षण विभागाने पहिल्या टप्यात राज्यात ३०० जिल्हा परिषद शाळा “आदर्श शाळा” म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. काही निकषांच्या आधारे साधारणतः प्रत्येक तालुक्यातून १ अशा ३०० शाळाची निवड करण्यात आली आहे. साधारणतः या निवडलेल्या शाळा १ ली ते ७ वी पर्यंतच्या शाळा असाव्यात आणि गरज पडल्यास त्यात ८ वी चा वर्ग यात समाविष्ट करण्यास वाव होता. अशा शाळांची यादी जिल्हा निहाय शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली होती, त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कणकवली तालुक्यातील खारेपाटण केंद्र शाळेची निवड करण्यात आली आहे.

या शाळेला हा बहुमान मिळण्यामागे श्रावणकर सरांचा मोठा हाथ असून २०१३ साली मुख्याध्यापक म्हणून श्रावणकर यांनी खारेपाटण केंद्र शाळेचा चेहरा मोहराच बदलून टाकला होता. त्यांना या कार्यात त्यांच्या सहाय्यक शिक्षकांनी मोलाची साथ दिली होती. तसेच त्यानी स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना मदतीला घेऊन लोकसहभागातून शाळेचा विकास कसा करता येईल हे दाखवून दिले आहे.

या उपक्रमाची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने माझी समृध्द शाळा हा पुरस्कार शाळेला दिला आहे. सन २०१८ मध्ये शिक्षणाची वारी या राज्यस्तरीय शाळाच्या अधिवेशनात कोल्हापूर येथे लोकसहभागातून शाळेचा विकास या विषयावर सादरीकरण करण्याचा बहुमान सिंधुदुर्ग मधून प्राप्त झाला होता. सन २०१८-१९ मध्ये या शाळेला शिक्षक भारती या राज्य स्तरीय संस्थेचा आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या साठी व्यवस्थापन समितीचे सौ. गौरी शिंदे, संतोष पाटणकर, हरी इसवळकर, अण्णा तेली, शिवाजी राऊत, अमोल तळगावकर, तसेच सर्व आजी माजी सदस्य, माजी विद्यार्थी हे सतत धडपड करत असतात. या सर्वांच्या मेहनतीला मिळालेले हे यश असून सर्व स्तरातून यांचे कौतुक होत आहे.

अभिप्राय द्या..