अनंत पिळणकर यांना मंत्री जयंत पाटील आणि मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आश्वासन
कणकवली /-
कणकवली तालुक्यातील नवीन कुर्ली गावच्या ग्रामपंचायतीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला जाणार असून लवकरच मंत्रालयात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रश्नाबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची नवी कुर्ली विकास समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी भेट घेतली यावेळी श्री पाटील यांनी त्यांना मुंबई येथे बोलाविले आहे. तसेच नुकतेच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशीही अनंत पिळणकर यांची चर्चा झाली असून आपण एकत्रितपणे ग्रामविकास मंत्र्यांशी चर्चा करून हा विषय तातडीने सोडवू असेही आश्वासन त्यांनी दिले आहे.
कणकवली तालुक्यात झालेल्या देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पामुळे कुर्ली गाव विस्थापित झाला. फोंडा गावच्या माळावर या गावाची वसाहत वसविण्यात आली. मात्र अद्यापही या नवीन कुर्ली गावात ग्रामपंचायत झाली नाही. त्यामुळे गावच्या विकासाला खिळ बसली आहे. गावाचे अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. सध्या गावच्या विकास समितीच्या माध्यमातून पाटबंधारे विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून अनंत पिळणकर यांनी गेली १२ वर्ष येथील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र जोपर्यंत इथल्या ग्रामपंचायतीचा प्रश्न मार्गी लागत नाही तोवर इथल्या विकासाला गती मिळत नाही. या दृष्टिकोनातून अनंत पिळणकर यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. नवीन कुर्ली गावाची वसाहत जलसंपदा विभागाच्या माध्यमातून वसविण्यात आली आहे. या ठिकाणी दुरुस्ती व देखभालीची कामे तसेच येथील विकासाची कामे पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून केली जात आहेत. मात्र अद्यापही अनेक कामे रखडलेली आहेत. याकडे लक्ष वेधतानाच इथल्या ग्रामपंचायतीचा प्रश्न मार्गी लावला जावा याकरता पिळणकर यांनी जयंत पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
तसेच नुकतेच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादीचे जिल्हा संपर्क मंत्री आणि राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशीही अनंत पिलांकर यांनी नवीन कुर्ली गावच्या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली. हा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुशरीफ यांच्यासोबत संबंधित विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना घेऊन मंत्रालयात बैठक घेतली जाईल. असे या दोन्ही मंत्र्यांनी सांगितले आहे. या बैठकीला नवीन कुर्ली गावच्या विकास समितीचे अध्यक्ष म्हणून अनंत पिळणकर यांनाही मुंबई येथे बोलाविण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच कुर्ली गावच्या ग्रामपंचायतीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.