सिंधुदुर्ग /-

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील संयमी व सुसंस्कृत असे नेते आहेत. गेल्या पंधरा वर्षात शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर असंख्य वेळा त्यांचे नाव घेऊन टिका केली असेल परंतु उद्धवजींनी चुकून सुद्धा नारायण राणेंच्या नावाचा उल्लेख त्यांच्या मुखातून केला नाही. खरंतर कालच्या दसरा मेळाव्याच्या भाषणात सुद्धा उद्धव ठाकरेंनी नारायण राणे आणि त्याच्या मुलांचा उल्लेख टाळला होता. मात्र शिवसेना पक्षप्रमुखांनी ‘एक बेडुक आणि त्याची दोन पोरं’ हे केलेले वर्णन आपल्यालाच चपखल बसते हे नारायण राणेंच्या लक्षात आल्याने त्यांनी उद्धव ठाकरेंनी बेडकांच्या नावाने उडवलेली टोपी स्वतःहून झेलली आणि आपल्या डोक्यावर घालून घेतली. आता नारायण राणे स्वतःलाच बेडूक समजायला लागले तर त्यावर आपण तरी काय बोलणार…? त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यात नारायण राणेंच्या बाबतीत बेडूक हे नवीन विशेषण प्रचलित होईल. त्यांचे सध्याचे वागणे देखील या विशेषणला शोभेसेच आहे. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील झंझावाती भाषणानंतर भाजपने पाळलेला हा बेडुक दुसऱ्याच दिवशी प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन डराव डराव करू लागला.

बेडूक हे विशेषण ऐकल्यावर नारायण राणेंच्या अंगाचा तिळपापड झाला आणि त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यामुळेच आपण पत्रकार परिषदेत कुणाविषयी बोलत आहोत याचेही किमान भान त्यांना राहिले नाही. त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला. महाराष्ट्राच्या राजकारणाला यशवंतराव चव्हाण यांच्यापासून शरदराव पवारांपर्यंत सुसंस्कृत विरोधी नेत्यांची परंपरा आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात राजकारण करीत असताना सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेते सभ्यतेचे काही अलिखित संकेत पाळतात. नारायण राणेंनी मुख्यमंत्री पदावर विराजमान असलेल्या उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करून सभ्यतेचे अलिखित संकेत पायदळी तुडवले आहेत. खरं तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी नारायण राणेंना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवून वाल्याचा वाल्मिकी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र वाल्यामध्ये कसलीच सुधारणा झालेली दिसत नाही. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसून सुद्धा नारायण राणेंना त्या खुर्चीचे पावित्र्य, प्रतिष्ठा आणि पत कधी समजलीच नाही. अन्यथा त्यांनी टिका करताना किमान सामाजिक भान पाळून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख टाळला असता.

आमदार नितेश राणेंना मी सांगू इच्छितो की मातोश्रीच्या अंगणात तुळशी व्रुंदावनच आहे. त्यांनी आपल्या मोठ्या भावाकडे विचारणा केली असती तर गांजाची शेती कुणाच्या अंगणात पिकते याचा त्यांना त्वरित उलगडा झाला असता. ‘आपण हसे लोकाला आणि शेंबुड आपल्या नाकाला’ अशीच काहीशी नितेश राणेंची अवस्था झालेली आहे. मुळात ‘संस्कार’ हा शब्दच नितेश राणेंच्या तोंडी शोभत नाही कारण या शब्दाशी त्यांचा दूरान्वयेही संबंध नाही. चिंटू शेखवर गोळीबार करण्याचे, हॉटेल व्यावसायिक हितेश केसवाणी कडून खंडणी उकळण्याचे, गोव्यात टोल नाक्यावर तोडफोड करण्याचे, वेंगुर्ल्यात विलास गावडेच्या घरावर रात्री अपरात्री लाथा मारून राडा करण्याचे, होंडा शोरुम जाळून टाकण्याचे, सरकारी अधिकाऱ्यांवर बांगडाफेक आणि चिखलफेक करण्याचे संस्कार नारायण राणेंनीच त्यांच्यावर केले होते का…? निलेश राणेंनी ज्या अमानुष पद्धतीने संदीप सावंत या स्वतःच्याच कार्यकर्त्याला मारहाण केली ते संस्कार नारायण राणेंनीच आपल्या मुलावर केले होते का…?? याचेही उत्तर त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला द्यायला हवे. फक्त संस्कारांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास जगातील दोन असंस्कृत, असभ्य आणि असंस्कारक्षम मुलांचे नारायण राणे हे पिता आहेत, असेच खेदाने म्हणावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page