मालवण /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनता दरबार भरवला जातो. मंत्र्यांच्या अनेक बैठका शासकीय कार्यालयात होतात. असे असताना पंचायत समितीच्याच मासिक सभा ऑनलाईन का ? ग्रामीण जनतेचे प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी असलेले व्यासपीठ ऑनलाईन चक्रात अडकवून ठेवू नका. यापुढील सभा सोशल डिस्टन्स नियमांचे पालन करत सभागृहातच घ्या. अशी आग्रही मागणी पंचायत समिती गटनेते सुनील घाडीगावकर यांनी गटविकास अधिकारी जे. पी. जाधव यांच्याकडे केली.
नवनियुक्त गटविकास अधिकारी जे. पी. जाधव यांची
घाडीगावकर यांनी भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, श्रावण सरपंच
प्रशांत परब, असगणी सरपंच हेमंत पारकर, निरोम माजी सरपंच अविनाश राऊत, श्रावण ग्रा. प. सदस्य प्रमोद घाडी उपस्थित होते.
कोरोनामुळे खबरदारीच्या उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन सभा घेण्यात आल्या. ग्रामीण भागात नेटवर्कच्या अनेक समस्या असताना आमच्या सारख्या अनेक सदस्यांनी सहभागी होण्याचा प्रयत्न केला. मात्र खंडित होणाऱ्या नेटवर्कमुळे जनतेच्या समस्या मांडताना अनेक समस्या येतात. मासिक सभेत सर्वच विभागाचे अधिकारी उपस्थित असल्यामुळे जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करणे अथवा त्यावर मार्ग सुलभ होते. तसा प्रतिसाद ऑनलाईन बैठकांना मिळत नाही. तरी यापुढील सभा सभागृहाताच घ्या. १२ सदस्य व प्रमुख अधिकारी सभागृहात उपस्थित ठेवा. अन्य अधिकारी यांना आवश्यतेनुसार निमंत्रित करा. अशी भूमिका घाडीगावकर यांनी मांडली. घाडीगावकर यांनी मांडलेल्या भूमिकेला गटविकास अधिकारी जाधव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कोरोना खबरदारी नियम व उपाययोजना नियमांचे पालन करून पुढील सभा सभागृहात घेण्यात येईल. असे स्पष्ट केले.
शासनाच्या विविध योजनांतून येणाऱ्या निधीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात विकासकामांना गती देत रोजगार उपलब्ध करण्यात एमआरजीएस योजना महत्वाची ठरत आहे. सर्वपक्षीय सहभागातून लोकहिताची विविध कामे पार पडत आहेत. मागील काही वर्षात मालवण तालुक्यात चांगल्या प्रकारे राबवली जाणारी ही योजना पुढील काळातही अशाच पद्धतीने राबवून आपणही विकासाला गती द्याल. असा विश्वास घाडीगावकर यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page