मुंबई-६सप्टेंबर
मुंबई पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा महामार्गासाठी (कोस्टल रोड) भराव टाकण्यास मच्छीमारांचा आणि पर्यावरणप्रेमींचा विरोध असताना आता आणखी सहा हेक्टरचा भराव टाकावा लागणार आहे. प्रकल्पासाठी आधी ९० हेक्टरचा भराव टाकण्यात येणार होता. मात्र आता एकूण ९६ हेक्टर जमीन भराव टाकून तयार केली जाणार आहे. मुंबई महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात तसे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळीपर्यंत ९.९८ किमीचा सागरी किनारा मार्ग तयार करण्यात येणार आहे. मात्र या मार्गासाठी टाकल्या जाणाऱ्या भरावामुळे मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावरील जैवविविधता नष्ट होईल, मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचे साधन जाईल अशी भीती व्यक्त झाल्यामुळे सुरुवातीपासूनच हा प्रकल्प वादात सापडला होता. उच्च न्यायालयाने या प्रकल्पाला व भरावाला स्थगिती दिली होती. या निर्णयाच्या विरोधात पालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने भरावावरील स्थगिती उठवली होती. त्यामुळे वेगाने काम सुरू होते.आतापर्यंत ५२.३५ हेक्टर जमीन भराव टाकून तयार झाली असल्याचेही पालिकेचे म्हणणे आहे. अजून ४४.१६ हेक्टर भराव टाकण्याचे काम शिल्लक आहे. त्यातच आता पालिका प्रशासनाने आणखी भराव करण्याची गरज असल्याचे या प्रतिज्ञापत्रात मान्य केले आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी पालिकेला भरावाची परवानगी नाही अशा ठिकाणी आधीच भराव घातला असल्याचा आरोप याचिकाकर्त्यां श्वेता वाघ यांनी केला.