मुंबई /-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांच्याकडे ती नैतिकता नाही. निवडणुकीआधी भाजपसोबत युती केली. मोदींच्या नाववर 56 खासदार निवडून आले. ते नसते तर 25 खासदारही निवडून आले नसते. यांनी बेईमानी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं. यांनी 56 आमदारांसाठी बेईमानी केली, अशा शब्दात भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे.
माझ्या आयुष्यात आतापर्यंत जे जे मुख्यमंत्री झाले त्यांनी आपल्या भाषणाने शैलीने विचाराने आणि कामाने आपली आणि महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढवली. त्याला आत्ताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अपवाद आहेत. त्यांच्या कालच्या भाषणात कसलाही ताळमेळ नव्हता, शिवराळ भाषेत ते बरळले. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्रीपदाची आब राखली. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद भूषवण्याच्या लायकीचे नाहीत, असा हल्लाबोल भाजप खासदार नारायण राणे यांनी केला. कालच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
राज्यात केलेल्या कोणत्याही कामाचा त्यांनी कालच्या भाषणात उल्लेख नाही. त्यांनी कालच्या भाषणात ना शेतकऱ्याचा उल्लेख केला, ना राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल ते बोलले. कोरोनावर तर ते बोललेही नाही. देशातील सर्वात जास्त 43 हजार रुग्णांचा मृत्यू झाला. इतके रुग्ण मृत्यूमुखी पडले. याची जबबादारी मुख्यमंत्र्यांची नाही का?, असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.