पाडलोसमध्ये बिबट्याचा कुत्र्यांवर हल्ला..

पाडलोसमध्ये बिबट्याचा कुत्र्यांवर हल्ला..

बांदा /-

पाडलोसमध्ये घराशेजारी बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांत खळबळ माजली आहे. दोन दिवसांपूर्वी सतत दोन रात्री बिबट्या कुत्र्य़ांना भक्ष करण्यासाठी केणीवाडा येथील प्रेमानंद साळगावकर यांच्या शेती-बागायतीत आला होता. परंतु चार ते पाच कुत्र्यांनी त्याचा पाठलाग केल्याने बिबट्याचा डाव फसल्याचे तेथील कामगारांनी सांगितले. परंतु बिबट्यापासून आपणास धोका असल्याने वनविभागाने त्याला पकडण्याची मागणी कामगारांसह नागरिकांनी केली आहे.

गवा रेड्यांचा वावर सुरू असतानाच बिबट्यानेही आपला मोर्चा शेतकऱ्याच्या घराकडे वळवला आहे.

पाडलोस केणीवाडा येथील प्रेमानंद साळगावकर यांच्या घराजवळील बागेत दोन दिवसांपूर्वी रात्रो 11.30 वाजताच्या सुमारास कुत्रे मोठमोठ्याने भुंकण्याचा आवाज आला. साळगावकर बाहेर येऊन विजेरीच्या सहाय्याने पाहिले असता कुणा प्राण्याचे डोळे दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु घराबाहेरील लाईट सुरू केल्याने आणि विजेरीच्या सहाय्याने पाहिले असता तो बिबटाच असल्याचे त्यांना समजले. मात्र, कुत्रे त्याच्या अंगावर धाऊन गेल्याने कुत्र्यांना भक्ष करण्यासाठी आलेल्या बिबट्याचा डाव फसल्याचे साळगावकर यांनी सांगितले.

रस्त्याच्या दुतर्फा झुडपे असल्याने रानटी प्राण्यांचा अंदाज येत नाही. बांदा-शिरोडा मार्गावर अनेक वेळा आपणास बिबट्याचे दर्शन झाल्याचे गावातील ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे वनविभागाने योग्य ती उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

अभिप्राय द्या..