मुंबई /-

माझ्यावर विनयभंगाचा खटला टाकला, आयुष्याची चार वर्षे वाया घालवली. भूखंडाच्या चौकशा लावल्या, जयंतराव कोणी किती भूखंड घेतले आता सांगतो. मी कोणतीही अपेक्षा ठेवली नाही, पक्षाचे काम करत राहणार. भाजप जशी वाढवली त्याच्या दुप्पट वेगाने राष्ट्रवादी वाढवून दाखवणार. जयंतराव मला बोलले तुम्ही राष्ट्रवादीत आले तर ईडी-बिडी लावतील, तर मी बोललो मी सीडी लावीन, अशी फटकेबाजी करत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी ज्येष्ठ नेते, खासदार प्रफुल पटेल, सुनिल तटकरे, सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.

खडसे म्हणाले, दिल्लीतील वरीष्ठांनीच राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला दिला. माझ्यावर सातत्याने अन्याय होत असताना देखील मी समोरासमोर संघर्ष केला. पण कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसला नाही. आयुष्यातील चाळीस वर्षे भाजपमध्ये काम केले. स्वाभाविक आहे जिथे 40 वर्षे राहिलो असल्याने एकाएकी पक्ष कसा सोडायचा असे वाटत होते, असेही त्यांनी सांगितले.

भाजप सरकारमध्ये माझ्या राजीनाम्याची मागणी कुणीही केली नव्हती. माझ्या चौकशीची कुणीही मागणी केली नव्हती. कुणीही राजीनामा मागितला नसताना मला राजीनामा द्यायला लावला. माझी तक्रार देवेंद्रजींवर आहे. माझ्यावर त्यांनी विनयभंगाचा खटला दाखल करायला लावला. हे मरणाहून मेल्यासारखं आहे. माझ्यासोबत अत्यंत खालच्या स्तरावर राजकारण करण्यात आले. यामुळे माझ्या कुटुंबियांनाही मनस्ताप सहन करावा लागला. माझ्यावर पाळत ठेवली गेली. मंत्री असताना नऊ महिने पाळत ठेवली. मला काही मिळाले किंवा नाही मिळाले याचे दुख नाही, मी माझ्या ताकतीने ते मिळवले, असे ते म्हणाले.
खडसे यांच्या प्रवेशानंतर शरद पवार म्हणाले, एकनाथ खडसे यांनी 40 वर्षांपासून भाजप पक्षासाठी मोठे कार्य केले आहे. एकनाथ खडसे हे गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक मानले जातात. परंतु मुंडे यांच्या निधनानंतर कालांतराने एकनाथ खडसेंना भाजपात सातत्याने डावलले जात होते. एकनाथ खडसे यांनी राज्याच्या विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद भूषवले आहे. तसेच फडणवीस सरकारमध्ये त्यांनी महसूलमंत्री म्हणून काम केल्याचे पाहिले असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्रिमंडळात बदल नाही – शरद पवार
जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम सुरु आहे. त्यांना नाथाभाऊंची साथ मिळाली. करोनामुळे अजित पवार काळजी घेत आहेत. जे मंत्री आहेत ते तसेच असतील, बदल नाही. एक शब्दाने त्यांनी कसली अपेक्षा आहे, काय हवं असे नाथाभाऊ बोलले नाही. त्यांनी काहीच मागणी केली नाही. कोण मंत्री आहेत ते तसेच राहतील. जयंतराव यांच्या नेतृत्वाखाली संघटना काम करत आहे. अजित पवार नाराज, कशाला नाराज.. करोना काळात काळजी घ्यावी लागते. जनतेशी बांधिलकी आहे. जितेंद्र आव्हाड, मुंडे, बाळासाहेब पाटील यांना करोना झाला सगळ्यांच्या बाबत काळजी घेत आहोत. अधिक खबरदारी घ्यावी म्हणून सहकारी आले नाही, तर काही गडबड नसल्याचे सांगत शरद पवार यांनी सर्व चर्चांवर पडदा टाकला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page