मुंबई /-
कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याबद्दल न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलेल्या राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही मागणी केली आहे. “आपले पद टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसपुढे हतबल झालेले दिसतात,” अशी टीकाही यावेळी त्यांनी केली आहे.
“न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्यानंतर नैतिक जबाबदारी म्हणून यशोमती ठाकूर यांनी ताबडतोब मंत्रिपदाचा राजीनामा देणं आवश्यक होतं. पण अजूनही त्या पदाला चिकटून राहिल्या आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी भाजपाची मागणी आहे. यशोमती ठाकूर स्वतःहून राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणे गरजेचं आहे. पण मुख्यमंत्री याविषयी काहीच भूमिका घेत नाहीत. आपले पद टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसपुढे हतबल झालेले दिसतात,” अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.