राज्यपाल नियुक्त जागेवर खडसेंची नियुक्ती; १२ नावांचीही चर्चा..

मुंबई/-

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिमंडळात फेरबदल होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नागपूर येथे होणार्‍या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या आधीच हे फेरबदल होण्याची शक्यता आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्‍चित असून, त्यांची कृषिमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता ज्येष्ठ नेते वर्तवित आहे. राज्यपाल नियुक्त जागांसाठी 12 जणांची नावे चर्चेत असून, त्यात खडसे यांचेही नाव आहे.
मंत्रिमंडळ फेरबदलात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात काही खात्यांची अदलाबदल, तर काही नवीन चेहर्‍यांचा समावेश करून एखाद्या विद्यमान मंत्र्याला डच्चू मिळणार असल्याची चर्चा आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याने त्यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी देण्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादीकडे असलेले गृहनिर्माण खाते शिवसेनेकडे जाणार असून, त्याबदल्यात शिवसेनेकडे असलेल्या कृषी खात्यासह आणखी एखादे खाते राष्ट्रवादीला दिले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या दोन खात्यांसह रोजगार हमी, उत्पादन शुल्क, कामगार, अल्पसंख्यांक कल्याण या खात्यांमध्ये खांदेपालट होणार असल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रवादीकडील गृहनिर्माण खाते शिवसेनेकडे गेल्यास या खात्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांना पक्षकार्यासाठी जुंपले जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आव्हाड हे राष्ट्रवादीचा आक्रमक चेहरा मानले जातात. भाजपवर हल्ला करण्यासाठी आव्हाड यांचा उपयोग करून घेतला जाईल. शिवाय, सोशल इंजिनिअरिंग साधले जाईल, असा दावा राष्ट्रवादीच्या एका नेत्याने केला. विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 जागांच्या नियुक्तीबाबत महाविकास आघाडी सरकारच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्यपाल नियुक्त 12 नावांना मंत्रिमंडळाची मंजुरी देऊन ती नावे मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवली जाणार आहेत. महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यात झालेल्या संघर्षानंतर राज्यपाल या नावांना पसंती देणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

कोणती नावे चर्चेत ?

काँग्रेसकडून रजनी पाटील, सत्यजित तांबे, नसीम खान, मुझफर हुसेन, सचिन सावंत आणि मोहन जोशी या नावांची चर्चा आहे. तर राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, श्रीराम शेटे, गायक आनंद शिंदे आणि उत्तमराव जानकर यांच्या नावाची चर्चा आहे. यात राजू शेट्टी याचे नाव यापूर्वीच अंतिम झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page