मनसेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन केली होती चर्चा..
मालवण /-
ग्रामपंचायतींमध्ये काम करणाऱ्या संगणक परिचालकांना गेल्या बऱ्याच महिन्यांचे वेतन अदा केले नसून ते त्वरित अदा करण्यात यावे अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांची भेट घेत केली. यावेळी झालेल्या चर्चेत येत्या आठ दिवसात संगणक परीचालकांचे मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल असे आश्वासन श्री. पराडकर यांनी शिष्टमंडळास दिले असल्याची माहिती मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव, मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपुरकर यांनी दिली.
‘आपले सरकार’ सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना दाखले देण्याची सेवा देणारे संगणक परिचालक करत असतात. शासनाच्या ऑनलाइन सुविधेमध्ये संगणक परिचालक हा महत्त्वाचा दुवा मानला जातो. परंतु अनेक महिने संगणक परिचालकांना वेतनच दिलेले नाही. याबाबत संगणक परीचालकांनी एका निवेदनाद्वारे मनसेचे लक्ष वेधले. या निवेदनाची दखल घेत मनसेचे तालुकाध्यक्ष विनोद सांडव व उपतालुकाध्यक्ष उदय गावडे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, उपजिल्हाध्यक्ष शैलेश अंधारी, महिला शहराध्यक्षा भारती वाघ, महिला उपतालुकाध्यक्षा राधिका गावडे, उदय गावडे, नंदकिशोर गावडे, उपशहराध्यक्ष विशाल ओटवणेकर, मनविसे उपतालुकाध्यक्ष संकेत वाईरकर, मनविसे शहराध्यक्ष साईराज चव्हाण, विजय गावडे, दिनेश कदम, सचिन गावडे, सुशील चव्हाण, दत्तराज चव्हाण, सिद्धेश मयेकर, रेकी फर्नांडिस आदी उपस्थित होते.
शिष्टमंडळाच्यावतीने मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी संगणक परिचालकांची बाजु गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांचेकडे मांडली. संगणक परिचालक हे प्रामाणिकपणे ग्रामपंचायत कार्यालयात काम करत असतात. १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतीकडे निधी जमा होतो. जमा झालेला निधी संबंधित ग्रामपंचायत आपल्या सेवा केंद्राच्या ठेकेदाराकडे संपूर्ण एका वर्षाचे प्रती महिना १२३३१ रुपये प्रमाणे १,४७,९७२ रुपये आपले सेवा केंद्राकडे म्हणजेच ठेकेदाराकडे जमा करते. या ठेकेदाराकडे संगणक खर्च, प्रिंटर खर्च, स्टेशनरी, सॉफ्टवेअर खर्च व इतर खर्च या ठेक्यात नमूद असल्याने ६ हजार रुपये प्रती महिना एवढेच तुटपुंजे मानधन देतो. परंतु हे मानधनही देण्यास ठेकेदार टाळाटाळ करत आहे. ३ ते ४ महिने मानधनच दिले गेले नाही. अनेक संगणक परिचालक आपले कुटुंबाचे चरितार्थ या मानधनावर चालवतात. आता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना कालावधीत सुद्धा लोकांची, शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून निमूटपणे काम करत आहे असे सांगत गटविकास अधिकार्यांचे लक्ष वेधले.
मनसेच्या शिष्टमंडळाला गटविकास अधिकार्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आठ दिवसाच्या आत संगणक परिचालकांना त्यांचे मानधन अदा केले जाईल असे सांगितले. तसेच तालुक्यातील ग्रामपंचायतीना संगणक परिचालकांचे मानधन वेळेत देण्यासाठी खास बाब म्हणून उपाययोजना करा अशाप्रकारचा आदेश दोन दिवसात पंचायत समितीकडून देण्यात येईल असे स्पष्ट केले. संगणक परिचालकांच्या विविध मागण्या रास्त असून त्यासंदर्भात सरकार दरबारी पाठपुरावा सुरू असल्याचेही श्री. पराडकर यांनी मनसे शिष्टमंडळाला सांगितले.