ब्युरो न्यूज /-

आत्तापर्यंत आपल्याला बाहुबली थाळी, सरपंच थाळी, खासदार थाली, आमदार थाळी अशा विविध प्रकारच्या थाळी बघायला मिळाल्या असतील. पण अमरावतीमधील हेरिटेज किचन फॅमिली रेस्टॉरंटने महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन वजनदार व्यक्तिमत्त्व असलेल्या शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या थाळ्या पहायला मिळणार आहे.त्यानुसार पवार नॉनव्हेच थाली’ आणि ‘फडणवीस व्हेज थाळी’ सुरु केली गेली आहे.

अमरावतीमधील प्रसिद्ध असलेल्या हेरिटेज किचन या हॉटेलने एक नवा उपक्रम सुरू केलाय. ज्यात ६०० रुपयात पवार मांसाहारी थाळी तर ४०० रुपयात फडणवीस शाकाहारी थाळी आहे.सहाशे रुपयांच्या पवार मांसाहारी थाळीमध्ये मटण, चिकन, अंडाकरी, फिश सह एक चिकन बिर्याणी, अनलिमिटेड भाकरी पोळ्या किंवा तंदुरी रोटी मिळते.

एवढंच नव्हे तर वरून स्वीट, आईस्क्रीमसुद्धा दिला जातो. तर फडवणीस नावाच्या शाकाहारी थाळीत तीन भाज्या, दालफ्राय, एक स्वीट, आईस्क्रीम, व्हेज बिर्याणी, अनलिमिटेड पोळ्या किंवा भाकरी किंवा तंदूर रोटी मिळते.

विशेष म्हणजे पवार नॉनव्हेज थाळी आणि फडणवीस व्हेज थाळी हीदोन व्यक्तींसाठी आहे. म्हणजेच एका थाळीत दोन जण आरामात पोटभर जेवू शकतात. दोन व्यक्ती असल्याशिवाय थाळी मिळणार नाही, हा कडक नियम आहे. अन्न हे पूर्णब्रह्म आहे त्यामुळे त्याची नासाडी होऊ नये हाच यामागचा उद्देश आहे.

शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते आहेत. पुणे, कोल्हापूर, मुंबईच्या सरपंच थाळी, आमदार थाळी, खासदार थाळी, या प्रमाणे हेरिटेज किचन फॅमिली रेस्टॉरंटमध्ये ‘पवार थाळी’ आणि ‘फडणवीस थाळी’ सुरु करण्याची कल्पना सुचल्याचे नितीन गुडधे पाटील यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page