मालवण /-
मालवण बंदरात मेरिटाईम बोर्डाने दोन वर्षांपूर्वी समुद्रामध्ये बसविलेले नौकानयन बोया म्हणजे मार्गदर्शक दिवे पावसाळा कालावधीत समुद्राबाहेर काढून पावसाळ्यानंतर पुन्हा समुद्रात टाकण्याची कार्यवाही यावर्षी न झाल्याने हे बोया समुद्रातच बंद स्थितीत आहेत. बोयावरील लाईट तुटून समुद्रामध्ये वाहून गेल्या आहेत, काही बोयांनी आपली निश्चित जागा सोडली आहे तर एक बोया किनारपट्टीवर आला आहे. यामुळे शासनाचे बरेच नुकसान होत असून बोया अभावी मच्छीमारांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे याबाबत लक्ष घालून हा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांनी बंदर व मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मालवण व सर्जेकोट बंदरामध्ये यांत्रिक मासेमारी लहान व मोठ्या जवळपास ५०० ते ७०० नौका असून त्या नौका दरवर्षी मासेमारी करीत असतात जेव्हा मासेमारी करण्यासाठी यांत्रिक नौका मालवण बंदरातून व सर्जेकोट बंदरातून समुद्रामध्ये जातेवेळी नौकानयन बोया नसल्याने जाण्या- येण्याचा मार्ग चुकत असून अपघात होण्याची शक्यता आहे. सागरी अभियंता व चिफ सर्व्हेअर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मुंबई कार्यालयाने दोन वर्षापूर्वी मालवण बंदरामध्ये बोया समुद्रामध्ये टाकलेली होती. त्या बोयावरील लाईट तुटून समुद्रामध्ये वाहून गेल्या आहेत तर काही बोया ज्या जागेवर होते ती जागा सोडलेली आहे तर एक बोया किनारपट्टीला आलेला आहे. त्यामुळे शासनाचे बरेचसे नुकसान होत आहे. दरवर्षी बोया बाबत मच्छिमारांची आरडा ओरड सुरु असते व बोया वेळेत समुद्रामध्ये उभारले जात नाहीत. जर समुद्रामध्ये सर्व्हेकरुन बोयाच्या जागी समुद्रामध्ये पिलर उभारुन त्यावर लाईट बसविली तर प्रश्न मिटणार असून दरवर्षी येणारा खर्च कमी होईल. मालवण बंदरामध्ये १) कोटीयाचा खडक २) क्रुस खडक ३) कुभारमळीचा खडक ४) बुडक्याचा खडक ५) करंडयाचा खडक ६) बंदरातील बत्ती बोया या जागेवर जर सिमेंटचे पिलर उभारुन लाईट उभारल्यास मच्छिमारांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे व त्यामुळे समुद्रात येण्या जाण्याचा मार्ग समजून दुर्घटना होणार नाही.
तसेच सर्जेकोट बंदरामध्ये मासेमारी जेट्टी असल्याने कालावली खाडी मध्ये समुद्रामध्ये मासेमारी नौका जात असतात तेथे नौकानयन बोया नसल्याने समुद्रात जाते येते वेळी मोठी कसरत करावे लागते भविष्यात अपघात हाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सर्जेकोट येथील स्थानिक मच्छिमारांना विश्वासात घेऊन त्याठीकाणी समुद्रामध्ये खडकावर पिलर उभारुन लाईट लावण्यात यावी त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या खर्चाची बचत होणार आहे, तरी या विषयावर लक्ष घालून मच्छिमारांचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी मेघनाद धुरी यांनी केली आहे.
दरम्यान, मेघनाद धुरी यांनी उपस्थित केलेल्या या समस्येबाबत बंदर विभागाने माहिती देताना समुद्रातील मार्गदर्शक दिवे काढून पुन्हा बसविण्यासाठी टेंडर प्रक्रिया वरिष्ठ कार्यालयाकडून करण्यात आली आहे. समुद्रातील दिव्यांची पाहणी करून नादुरुस्त दिव्याच्या व्यवस्थेचीही माहिती घेतली गेली आहे. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मार्गदर्शक दिवे समुद्रात बसविण्यात येतील असे स्पष्ट केले.