मर्डे गावचे नाव मसुरे- मर्डे करण्याची ग्रामविकास मंत्र्यांकडे मागणी..

मर्डे गावचे नाव मसुरे- मर्डे करण्याची ग्रामविकास मंत्र्यांकडे मागणी..

मसुरे /-

मालवण तालुक्यातील मर्डे ग्रामपंचायतीचे नाव मसुरे – मर्डे करण्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत मसुरे ग्रामविकास संघ मुंबईचे अध्यक्ष डॉ. दीपक परब यांनी मंत्री महोदयांची मंत्रालय येथे भेट घेत याबाबत सविस्तर निवेदन दिले आहे.
मूळ मसुरे- डांगमोडे ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन दोन वर्षांपूर्वी एकूण तीन ग्रामपंचायत निर्माण करण्यात आल्या आहेत. बिळवस, देऊळवाडा आणि मूळ मसुरे- डांगमोडे ग्रामपंचायतीचे नामकरण मर्डे असे करण्यात आले आहे. विभाजन करताना ग्रामसभेने मूळ गावाचे नाव बदलावे असा कोणताही ठराव शासनाकडे दिलेला नव्हता. तसेच शासन दरबारी ग्रामसभेला अनन्य साधारण महत्व असल्याने विभाजना नंतर सुद्धा मूळ गावाचे मसुरे हे नाव असावे असा ठराव शासनाकडे केला होता. दिवंगत कामगार नेते जयवंत परब यांनी सुद्धा मसुरे हे गावचे नाव कायम रहावे अशी मागणी केल्याचे श्री. परब यांनी सांगितले
प्रशासकीय बाबीमुळे विभाजनामध्ये मूळ मसुरे गावच्या नावाचा उल्लेख नाहीसा झाला आहे. याबाबत ग्रामसभेने सुद्धा नाव बदल होण्यासाठी शासनाचे लक्ष वेधले होते. परंतु शासन स्तरावर याबाबत पुढे कोणतीही कार्यवाही झाली नाही आहे. मसुरे गावाला फार मोठे ऐतिहासिक महत्व, ऐतिहासिक वारसा असल्याने गावाची ही ओळख शासन दरबारी नाव रद्द झाल्याने पुसली जात आहे. नाव बदला मध्ये लोकसंख्या निकष कारणी भूत ठरत असला तरी मसुरे ही गावची ओळख कायम रहावी यासाठी शासनाने तातडीने निर्णय घेण्याची मागणी डॉ. दीपक परब यांनी केली आहे. यासंदर्भात यापूर्वी ऑगस्ट २०१९ मध्ये सुद्धा त्यांनी शासनाच्या ग्राम विकास विभागाचे लक्ष वेधण्यात आले होते.
दरम्यानच्या कालावधीत कोणताही निर्णय न झाल्याने आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दालनात झालेल्या भेटी वेळी संबंधित विभागाचे सचिव सुद्धा उपस्थित होते. मंत्री महोदयांनी सदर प्रश्नी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश सचिवांना दिल्याची माहिती डॉ. दीपक परब यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..