कोरोना रोखण्यासाठी गठीत केलेल्या समित्यांनी उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करावी.;जिल्हाधिकारी

कोरोना रोखण्यासाठी गठीत केलेल्या समित्यांनी उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करावी.;जिल्हाधिकारी

सिंधुदुर्गनगरी /-

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने सोपविलेली जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांनी विहीत वेळेत पार पाडावी. तसेच कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी गठीत केलेल्या समित्यांनी त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या व उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक हॉल येथे झालेल्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, वंदना खरमाळे, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, उपजिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी डॉ. जयकृष्ण फड, उपजिल्हाधिकारी वर्षा शिंगण, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. सावंत यांच्यासह जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध समितीची स्थापना केली असून यामध्ये मनुष्यबळ व्यवस्थापन समिती, गव्हमेंट कोविड हॉस्पीटल, CCC, DCHC, DCH बेड व्यवस्थापन समिती, मृतदेह व्यवस्थापन समिती, कोविड हॉस्पीटल व्यवस्थापन समिती, भोजन व्यवस्थापन समिती, गृह अलगीकरण व सर्वेक्षण समिती, कोरोना व्यवस्थापन संदर्भात अधिग्रहन समिती, रुग्णवाहिका व्यवस्थापन समिती, उपजिल्हा रुग्णालय व कोविड केअर सेंटर (CCC) व्यवस्थापन समिती, मृत्युदर (CFR) ॲडमिनीस्ट्रेटीव्ह ऑडिट समिती, निधी व्यवस्थापन समिती अशा समित्या निर्माण करण्यात आल्या आहेत. या समितीमार्फत जिल्ह्यातील कोरोनासाठी लागणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस व इतर मनुष्यबळ यांचे नियोजन करण्यात येणार असून CCC, DCHC, DCH, बेडचे व्यवस्थापन, कोरोनाने मृत्यु पावलेल्या मृतदेहाचे स्मशानभूमी विल्हेवाट लावणे, मृतदेहांच्या वाहतुकीकरीता शववाहिका उपलब्ध करणे, कोविड हॉस्पीटलमध्ये पुरेशा औषधांचा पुरवठा तसेच स्वच्छता या बाबत आढावा घेणे. कोविड सेंटरमध्ये देण्यात येणारे भोजन व त्याची गुणवत्ता तसेच पॅकेजिंग याबाबत मार्गदर्शन करणे. त्याचबरोबर माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेचे सर्वेक्षण करणे. गृह अलगीकरणातील रुग्णांना मेडिकल किट देणे, गृहभेटी देणे, तालुकानिहाय कोरोना बाधितांची आकडेवारी अद्ययावत करणे, कोरोनाग्रस्त रुग्णांना रुग्णवाहिका, शववाहिका व इतर वाहने उपलब्ध करुन देणे या वाहनांचे दर निश्चित करणे त्यासाठी टोल फ्री क्रमांक तयार करुन चोवीस तास सुरु ठेवण्यात येणार आहेत. यासाठी समितीनिहाय नेमुन दिलेल्या जबाबदाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांनी विनाविलंब पार पाडाव्यात. अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
00000

अभिप्राय द्या..