वेंगुर्ला /-
BSNL नेटवर्क च्या समस्या ३० सप्टेंबर पर्यंत सोडवून मार्गी लावाव्यात अन्यथा १ ऑक्टोबर रोजी रेडी – शिरोडा पंचक्रोशीतील ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी मार्फत आंदोलन करण्यात येईल असे निवेदन माजी जि. प.शिक्षण व आरोग्य व सभापती तथा विद्यमान जि. प. सदस्य प्रितेश राऊळ यांच्या माध्यमातून पं. स. सदस्य मंगेश कामत, रेडी सरपंच रामसिंग राणे, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, ग्रा पं सदस्य व ग्रामस्थ यांनी १४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग तसेच BSNL कार्यालय सावंतवाडी येथे दिले होते.परंतु ३० सप्टेंबर पर्यंत सदर सेवा सुरळीत चालू न झाल्याने १ ऑक्टोबर पासून शिरोडा- रेडी येथील ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी हे धरणे आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असल्याने ३० सप्टेंबर रोजी दूरसंचार जिल्हा प्रबंधक मांझी व अधिकारी भिसे यांनी रेडी ग्रामपंचायत येथे प्रितेश राऊळ यांची भेट घेऊन रेडी ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांच्या सोबत चर्चा करून कोरोना व पावसाळी हवामानाच्या परिस्थीतीत उदभवत असलेल्या समस्या मांडल्या व दिलगिरी व्यक्त केली. तसेच टॉवर दुरुस्ती विषयी कोल्हापूर कार्यालयाला कळविले असून २० ऑक्टोबर पर्यंत दुरुस्ती केली जाईल व दुरुस्तीनंतर रेडी – शिरोडा येथील रेंज बाबत सर्व्हे करून १५ नोव्हेंबर २०२० पर्यंत पूर्ण नेटवर्क सेवा सुरळीत करून तक्रारींचे निवारण करू, असे लेखी पत्र दिले . त्याचप्रमाणे या अनुषंगाने प्रितेश राऊळ, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांनी सदर विषयावर धरणे आंदोलन न करता सहकार्य करावे अशी विनंती केली. या चर्चेवेळी शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी शिरोडा राऊतवाडी येथील BSNL इमारत ही जीर्ण झालेली असून त्यावरील टॉवर धोकादायक स्थितीत असल्याने तो कधीही पडून शेजारील कुटुंबांना धोका उद्भवू शकत असल्याने लवकरात लवकर टॉवर बाबत योग्य ती कार्यवाही व्हावी, अन्यथा उदभवणाऱ्या प्रसंगास संबंधित खात्याला जबाबदार धरले जाईल अशा शब्दात तीव्र भावना व्यक्त केल्या.दूरसंचार जिल्हा प्रबंधक मांझी यांनी BSNL ची खंडित होत असलेली सेवा लवकरच सुरळीत करू असे लेखी आश्वासन दिल्याने नियोजित धरणे आंदोलन स्थगित करण्यात आलेले आहे. २५ ऑक्टोबर पर्यंत आश्वासनांची पूर्तता न झाल्यास BSNL च्या विरोधात जनआंदोलन छेडण्यात येईल, अशी माहिती जि. प. सदस्य प्रितेश राऊळ यांनी दिली आहे.ग्रामपंचायत रेडी येथे झालेल्या सदर चर्चे वेळी रेडी येथील विद्यार्थी, रेशन दुकान चालक, बँक कर्मचारी, महिला बचतगट प्रतिनिधी यांनीही BSNL च्या खंडित सेवेमुळे निर्माण झालेल्या समस्या व नुकसानी बद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.यावेळी रेडी सरपंच रामसिंग राणे ल, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, पं. स. सदस्य मंगेश कामत, रेडी उपसरपंच नामसेव राणे, ग्रा. पं. सदस्य आनंद भिसे,श्रीकांत राऊळ,शैलेश तिवरेकर, विनोद नाईक, पोखरणकर,चित्रा कनयाळकर , दादा राणे व रेडी ग्रामस्थ उपस्थित होते.