पंढरपूर /-
राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी अनलॉक 5 नंतर आता भाविकांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. दसऱ्यापर्यंत तरी मंदिरांची दारे उघडण्याची शक्यता धूसर झाल्याने भाविकांच्या तीव्र नाराजी आणि निराशा आहे. वास्तविक अनलॉक 5 मध्ये मंदिराबाबत सकारात्मक निर्णय होईल अशा आशेवर राज्यभरातील भाविक निर्णयाची वाट पाहत होते. मात्र रेस्टारंट बार , हॉटेल उघडायला परवानगी देणाऱ्या ठाकरे सरकारने मंदिराची दारे मात्र बंदच ठेवल्याने भाविक आणि वारकरी संप्रदायात मोठी नाराजी आहे.
अनलॉक 5 मध्ये हॉटेल व इतर व्यवसायांना ज्या पद्धतीने अटी घातल्या तश्या अटी मंदिरातही घालून दारे उघडावीत अशी आता भाविक मागणी करीत आहेत,कोरोनाच्या संकटकाळात राज्यातील सर्वच धर्माच्या नागरिकांनी धार्मिकस्थळांबाबत खूप सकारात्मक भूमिका घेत सरकारला पाठिंबा दिला होता. आता मात्र धार्मिक स्थळांची दारे बंद होऊन सहा महिने उलटूनही शासन हि दारे उघडण्यास तयार नसल्याने भाविकांच्या भावना तीव्र आहेत.
सध्या पंढरपूरमध्ये वारकरी संप्रदायात महत्वाचा मनाला जाणारा आणि 3 वर्षातून येणार अधिक महिना सुरु आहे. राज्यभरातून रोज हजारो भाविक पंढरपुरात येऊन नामदेव पायरी आणि कळसाचे बाहेरून दर्शन घेत असून चंद्रभागेच्या स्नानावर समाधान मानीत आहेत. कोरोनाचे वाढते संकट पाहता शासनाने मंदिरे उघडण्याची मानसिकता नसल्याचे पाहून मुंबई उच्य न्यायालयानेही एका जनहित याचिकेवर मंदिर उघडण्याबाबत हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.
मात्र अशा संकटकाळी देवाच्या दर्शनाने सकारात्मक ऊर्जा तयार होईल जी या रोगाशी लढण्यास मदत करेल अशी भाविकांची भूमिका आहे. अधिक महिना संपल्यानंतर अश्विन महिन्यात नवरात्र येणार असून या काळात मंदिरे उघडण्यास राज्यातील काही मोठ्या देवस्थानाकडून नकारात्मक भूमिका समोर आल्याने दसऱ्यापर्यंत मंदिरे उघडण्याची शक्यता कमी दिसत आहे.
एकाबाजूला राजकीय पक्षांनी मंदिरे उघडण्याबाबत आंदोलने केली तरी शासनावर याचा काही फरक पडला नसला तरी आता राज्यातील भाविक कोरोनाच्या कडक नियमाचे पालन करीत मंदिरे उघडण्याच्या करीत असलेल्या मागणीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार हेच महत्वाचे ठरणार आहे.