सावंतवाडी /-
मळगाव मार्गावर रेल्वे स्टेशन समोर गोव्यातून बेकायदा केल्या जाणार्या गोवा बनावटीच्या दारु वाहतुकी विरोधात उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने कारवाई केली. या कारवाईत विविध ब्रँडचे ५५ बॉक्स व दारु वाहतुकीसाठी वापरलेली स्विफ्ट कार असा एकूण ७ लाख ६३ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आंतोन लॉरेन्स रॉड्रिग्ज (३७, किनळे, ता. सावंतवाडी) याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. ही कारवाई गुरूवारी पहाटेच्या सुमारास करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोव्यातून मळगावमार्गे सावंतवाडी अशी दारु वाहतुक होणार असल्याची माहिती कोल्हापूर भरारी पथकाला खबर्यांकडून मिळाली होती. त्यानुसार कोल्हापूर विभागीय उपायुक्त यशवंत पवार यांच्या मार्गदर्शना खाली मळगाव रेल्वे स्टेशन समोर सापळा रचला होता. मळगावहून सावंतवाडीकडे जाणारी स्विफ्ट कार (जीए ०५ डी २४८२) तपासणीसाठी थांबविण्यात आली. तपासणी दरम्यान कारमध्ये रॉयल ब्रँड, मॅकडॉल नं. १ व्हिस्की, डीएसपी ब्लॅक व्हिस्की व डॉक्टर स्पेशलचे तब्बल ५५ बॉक्स आढळले. दारु व कार असा एकूण ७ लाख ६३ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. बेकायदा दारु वाहतुक प्रकरणी आंतोन रॉड्रिग्ज याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला,ही कारवाई कोल्हापूर विभागीय उपायुक्त यशवंत पवार व जिल्हा अधीक्षक डॉ. डी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस. एस. साळवे, उपनिरीक्षक जितेंद्र पवार, कुमार कोळी, अमित जगताप, जवान सुहास वरुटे, सुखदेव सीद, प्रदिप गुरव व दीपक कापसे यांच्या पथकाने केली.