कणकवली /-
जुगार हा अनधिकृत धंदा परवानग्या देवुन अधिकृत करावा अशी अजब मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली यांच्याकडे केले आहे. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दया मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली यावेळी निवेदन देण्यात आले त्यातून हि मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन देतेवेळी मनसेचे उप जिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांच्यासह कणकवली तालुका अध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर, शांताराम सादये, संतोष कुडाळकर, निखिल आचरेकर आदी उपस्थित होते.
या निवेदनात असे म्हटले आहे कि, यावेळी दिनांक २१ सप्टेंबर २०२० रोजी रात्रौ ८.३० ते १० च्या दरम्यान कणकवली पोलिस स्टेशनकडुन जुगार खेळताना धाड टाकुन सुमारे १४ ते १६ जणांना जुगार खेळत असताना पकडण्यात आले.पण त्याठिकाणी पकडलेल्यांमधुन ४ जणांना आरोपी करुन अन्य १० जणांना आर्थिक तडजोड करुन सोडुन दिल्याची चर्चा कणकवली शहरात आहे. तसेच फोंडा येथे जुगार खेळताना धाड टाकण्यात आली, काल-परवाच हळवल येथील एका प्रतिष्ठीत नागरिकाच्या शेतघरावर पार्टी निमित्ताने जुगार चालु असता धाड टाकण्यात आली. या टाकलेल्या धाडींचा विचार करता या धाडींचा अर्थ हा अर्थपूर्ण आहे हे दिसुन येते.
हळवल येथील धाडीत आरोपी आधीच पळुन गेल्याचे प्रथम दर्शनी दिसुन आले, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र या शेतघरातुन गाडया घेवुन पळुन जाण्यासाठी एकच मार्ग असल्याने पोलिसांच्या अगोदर आरोपी पळणे शक्य नाही त्यात जागेवर कोणतेही जुगार साहीत्य न मिळणे, त्या जुगार धाडीत एकही गाडी न मिळणे, त्या टाकलेल्या धाडीत एकही पुरावा न सापडणे हे हास्यास्पद तसेच संशयास्पद आहे.
आज कणकवली शहरासोबतच कणकवली तालुक्यात, जिल्ह्यात अनेक ठिकाणी अनधिकृत दारु धंदे, मटका, वेश्या, अनधिकृत गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात चालु आहे. मात्र या अनधिकृत धंद्यांवर काही अपवाद वगळता कणकवली पोलिसांकडुन धाड टाकलेली दिसुन येत नाही. यावरुन हे अनधिकृत धंदे पोलिसांच्या वरदहस्ताने चालु आहेत की काय ? असे असेल तर जुगार खेळालाही आपणाकडुन परवानगी मिळावी. जेणेकरुन या कोविडमुळे शासनाचे महसुली नुकसान झाले आहे. या नुकसानीत या धंद्यामुळे महसुलात भर पडुन या महसुल रक्कमेचा कोविड रुग्णांच्या सुविधेत वाढ होण्यासाठी मदत होईल. त्यामुळे हे सदर जुगाराचे चालु असलेले अनधिकृत धंदे त्यांना परवानग्या देवुन अधिकृत करावे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपणास या निवेदनाद्वारे कळवु इच्छीतो, वरील दिलेले सर्व अनधिकृत धंदे बंद करण्यात यावेत. अन्यथा आम्हाला आपल्या कार्यालयावर धडक मोर्चा काढावा लागेल. उदभवणार्या परिस्थितीस आपणच जबाबदार असाल. असेही म्हटले आहे.