✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

मुंबई-गोवा महामार्गावरील पावशी येथील सर्व्हिस रोडप्रश्र्नी अखेर अनधिकृत स्टॉल्स आज संध्याकाळी पोलिस बंदोबस्तात हटविण्यात आले. यावेळी पावशी ग्रामपंचायत सरपंच वैशाली पावसकर, उपसरपंच कांता तेली, बाळा कोरगावकर, श्रीपाद तवटे, बंटी तुळसकर तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. तसेच हायवे प्राधिकरणचे वरिष्ठ अभियंता साळुंखे, कनिष्ठ अभियंता रूपेश कांबळे यांच्या मुख्य उपस्थितीत हे स्टॉल्स हटविण्यात आले.

पावशी ग्रामपंचायत कार्यालयासमोर मंगळवारी मुंबई-गोवा महामार्गावर जनआंदोलन करून वाहतूक रोखली होती. ग्रामपंचायत कार्यालयानजिक बोरभाटवाडी तेथे तातडीने सर्व्हिस रोड आणि बसस्टाॅप करावा, या आग्रही मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी हायवे प्राधिकरणच्या अभियंत्यांनी दोन दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, आज संध्याकाळी ४ वाजता पावशी ग्रामपंचायतीकडे स्थानिक नागरिक, हायवेचे अधिकारी तसेच कुडाळ पोलिस दाखल झाले. काही वेळात जेसीबी आणून हायवेच्या बाजूला असलेले स्टॉल्स हटविण्यात सुरुवात झाली. यावेळी मंगळवारी केलेले पावशी गावातील आंदोलनकर्ते आणि हायवेच्या अधिकाऱ्यांमध्ये काही वेळ किरकोळ बाचाबाची सुद्धा झाली. हायवेच्या अधिकाऱ्यांनी सर्व अनधिकृत स्टॉल्सवर कारवाई होईल, असे स्पष्ट केले. पण, स्थानिकांनी याला विरोध दर्शविला. यावेळी पोलिसांनी याकामी हस्तक्षेप केल्याने जेसीबीद्वारे अखेर कारवाई करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page