सिंधुदुर्ग /-
महाराष्ट्र शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा आढावा घेण्यासाठी आणि ती मोहिम अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने आज सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पंचायत समिती सभापती,उपसभापती आणि गटविकास अधिकारी यांच्या समवेत व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे संपर्क साधला.यावेळी पालकमंत्र्यांनी सदर मोहिम अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत सुचना दिल्या.
या वेळी सुरूवातीला वेंगुर्ले सभापती सौ अनुश्री कांबळी यांनी वेंगुर्ले तालुक्यातील या मोहिमेच्या अंमलबजावणीचा आढावा देताना स्पष्ट केले की तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील सुमारे ७०% काम पुर्ण झाले असून नागरिकांचाही प्रतिसाद चांगला मिळत आहे.तालुक्यातील आडेली प्राथमिक आरोग्य केंद्र,परुळे प्राथमिक आरोग्य केंद्राना रुग्णवाहिका आवश्यक असुन ग्रामीण रुग्णालयात वेंगुर्ला आणि उपजिल्हा रुग्णालय शिरोडा येथे रुग्णवाहिकेची आवश्यकता आहे तसेच वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाच्या नविन इमारतीचे काम पूर्णत्वास येत असून या ठिकाणी व्हाँन्टिलेटर,एक्सरे,अल्ट्रासाऊंड मशिन आदि सुसज्ज मशिनरींचा पुरवठा व्हावा, तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागातील रिक्त असलेली सर्व पदे त्यात तांत्रिक,अतांत्रिक तसेच कार्यालयीन पदे लवकरात लवकर भरल्यास आरोग्य यंत्रणेतील ताण कमी होण्यास मदत होणार असल्याने त्याबाबत निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली.
देवगड पंचायत समिती सभापती सुनिल पारकर यांनी देवगड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच रुग्णालयातील रुग्णवाहिकांसंदर्भात आणि त्यांच्यावर असणा~या अपु~या मनुष्यबळासंदर्भात पालकमंत्री यांचे लक्ष वेधून त्वरीत याबाबत कार्यवाही करण्यासंदर्भात मागणी केली,तसेच आरोग्य कर्मचारी सर्वाच्या घरा घरात जाऊन तपासणी करत आहेत त्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी केली.पावसामुळे शेतक~यांचे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे तातडीने व्हावेत अशीही मागणी केली.
मालवण पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे यांनी कुंभारमाठ येथिल कोव्हिड केअर सेंटर मध्ये व्हँन्टिलेटरची आवश्यकता असून सदर सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.तसेच तालुक्यात चांगल्या पद्धतीने मोहिम राबविण्यात येत असल्याचे सांगितले.
यावेळी पालकमंत्री सामंत यांनी संबधित सर्व मागण्यांची दखल घेत त्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करणार असल्याचे स्पष्ट केले.तसेच जिल्हात सदर मोहिम प्रभावीपणे राबवण्याची जबाबदारी सर्वांचीच असल्याचे सांगितले, तोंडावर मास्क लावणे बंधनकारक असून सदर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात जिल्हा पोलिस प्रशासनाला सुचना दिल्या असल्याचेही सांगितले.