काणेकर ट्रस्टचा कै.सौ. उमा काणेकर स्मृती पुरस्कार सोहळा संपन्न..

लोकसंवाद /- कणकवली.

लोकशाहीमध्ये जनतेला प्रोत्साहन देणाऱ्या सामाजिक संस्थांची नितांत गरज आहे. अशा प्रकारचे समाजभान ठेवून काणेकर ट्रस्ट उत्कृष्ट काम करत आहे. त्यांनी राज्यस्तरावरही काम करावे अशी अपेक्षा भारत सरकारच्या संयुक्त सचिव (आय.ए.एस) सुषमा तायशेटे यांनी व्यक्त केली.        

कणकवली शहराच्या महाराजा हॉलमध्ये कै.सौ. उमा काणेकर स्मृती पुरस्कार सोहळ्यात तायशेटे बोलत होत्या. व्यासपीठावर पद्मश्री परशुराम गंगावणे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्यिक बाबुराव शिरसाट, प्रसिद्ध चित्रकार संजय शेलार, प्रकाशक आणि संपादक प्रकाश केसरकर, काणेकर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष, ललित लेखक महेश काणेकर, कार्याध्यक्ष प्रशांत काणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी, स्वातंत्र्य सैनिक आप्पा काणेकर यांच्या कार्याला आणि स्मृतीला उजाळा देणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे भाग्य मला मिळाले असे उद्गार काढले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून साहित्यिक बाबुराव शिरसाट म्हणाले, “कर्तुत्ववान व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित केलेस त्यांना प्रोत्साहन मिळणार आहे आणि त्यांना त्यांच्या क्षेत्रात आणखीन काम करण्याची प्रेरणा मिळेल” 

जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी बोलताना सांगितले की,  एखादी संस्था स्थापन करून सातत्याने कार्यक्रम घेणे सोपे नाही. कोणताही प्रस्ताव न मागवता समाजातील गुणवंत रत्न शोधून त्यांना सन्मानित करण्याचे पवित्र काम काणेकर करत आहेत ही बाब कौतुकास्पद आहे.”

पुरस्कार प्राप्त व चित्रकला, निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव (चौकट)
यावेळी काणेकर ट्रस्टचा बालसाहित्य सेवा पुरस्कार कमलेश गोसावी, उपक्रमशील शिक्षक पुरस्कार राजेश कदम, अक्षरघर संकल्प पुरस्कार निकेत पावसकर, आदर्श सरपंच पुरस्कार सौ. रुपाली पालकर, साहित्य गौरव पुरस्कार रमेश वारके, लोकसंगीत सेवा पुरस्कार भालचंद्र दशावतार नाट्य मंडळ हळवल यांना देण्यात आले.  तर कै.सौ. उमा काणेकर स्मृती आदर्श शिक्षिका पुरस्कार अनुक्रमे सौ. दर्शना पारकर व सौ सुषमा गोवेकर यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. 

तसेच ज्येष्ठ अभिनेते कोकण सुपुत्र अभय खडपकर यांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यातआले. तसेच समाजात विशिष्ट क्षेत्रात काम करणाऱ्या प्रा. हरिभाऊ भिसे,  उपमुख्याध्यापक पी. जे.  कांबळे, डॉ. विठ्ठल गाड, गीतांजली नाईक, कल्पना मलये, अभियंता धनाजी महेकर, निवेदक संदेश तांबे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ट्रस्टमार्फत घेण्यात आलेल्या निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपात्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 

पुस्तक प्रकाशन, अक्षरोत्सव प्रदर्शनाचे उद्घाटन (चौकट)
यावेळी आप्पा काणेकर ट्रस्टच्या सन 2022 च्या पुरस्कार विशेषांकाचे प्रकाशन, बाबुराव शिरसाट यांच्या ‘आरोग्यासाठी पर्यावरण’ पुस्तकाचे प्रकाशन तसेच निकेत पावसकर यांच्या ‘अक्षराेत्सव’ प्रदर्शनाचे उद्घाटन  मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश तांबे यांनी तर आभार कल्पना मलये यांनी मानले. या पुरस्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page