पर्यटन दिनी लाल झेंडे फडकवत पर्यटन व्यवसायिक छेडणार आंदोलन .;बाबा मोंडकर

पर्यटन दिनी लाल झेंडे फडकवत पर्यटन व्यवसायिक छेडणार आंदोलन .;बाबा मोंडकर

मालवण /-

विविध संकटे व कोरोना महामारीमुळे अडचणीत सापडलेल्या पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या, अडचणी जाणून त्या सोडवण्यासाठी राज्य शासननाने सोबत राहावे व न्याय दयावा. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाचे केंद्र असलेल्या तारकर्ली, वायरी, देवबाग, मालवण, तोंडवळी या भागातील पर्यटन व्यावसायिक २७ सप्टेंबर या जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून आपल्या हॉटेलच्या बाहेर लाल झेंडा लावून ‘शांतता’ मार्गाने आंदोलन करणार आहेत, अशी माहिती तारकर्ली पर्यटन विकास संस्था अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिली.

पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गातील स्थानीक व्यावसायिकांनी सरकारी मदत किंवा कुठलेही अनुदान न घेता पर्यटन व्यवसाय उभे केले. पर्यटन क्षेत्रात जिल्ह्याचे नाव जगाच्या नकाशावर येण्यात स्थानिक पर्यटन व्यवसायिकांचे मोलाचे योगदान आहे. मात्र गेली दोन वर्षे सतत येणाऱ्या नैसर्गिक संकटांचा सामना करताना येथील पर्यटन व्यवसाय मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. गतवर्षी लांबलेला पाऊस, सतत धडकणारी वादळे यामुळे बहुतांश पर्यटन हंगाम वाया गेला. तर त्यांनंतर आलेल्या कोरोना संकटामुळे सहा महिने बंद असलेला पर्यटन व्यवसाय अद्यापही सुरू झालेला नाही.

दरवर्षी पर्यटन दिनानिमित्त पर्यटन वाढीसाठी सरकारची कुठलीही मदत न घेता टिटीडीएस संस्था तसेच पर्यटन व्यावसायिकांमार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. मात्र गेले सहा महिने कोरोनामुळे व्यवसाय पूर्णपणे ठप्प असल्याने जिल्ह्यातील होम स्टे, हॉटेल, लॉज, बोटींग, वाँँटर स्पोर्ट, स्कुबा डायव्हिंग, गाईड, टुरिस्ट वाहन चालक यांची आर्थिक स्थिति दननिय झाली आहे. या कठीण स्थितिमधून बाहेर पडणार कसे ? हा प्रश्न व्यावसायिकांना भेडसावत आहे.

व्यावसायिकांनी घेतलेली बँकेची कर्जे, त्यावरील थकीत हप्ते, वाढलेले व्याज, रिसॉर्टच्या कामगारांचा पगार प्रश्न, हॉटेल चालवायला ज्याने भाड्याने घेतले आहे त्यांची भाडे-डीपॉजिट, पर्यटन बंद काळातील वाढीव वीज बिले हे प्रश्न आवासून आहेत. तर कोरोना संक्रमणही थांबलेले नाही, अशा स्थितीत पर्यटन सुरु केले आहे मात्र पर्यटक अजून नाहीतच. बंद काळातील नुकसानीची भरपाई यासह अनेक समस्यांवर सरकारने पर्यटन व्यावसायिकांसोबत येणे गरजेचे आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत लक्ष द्यावा, अशी आमची आग्रही मागणी आहे. त्या बरोबरच या आंदोलनात जिल्हय़ातील पर्यटन व्यावसायिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन बाबा मोंडकर यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..