You are currently viewing उद्धव ठाकरे पोहोचले राऊत यांच्या घरी,कुटुंबीयांना दिला धीर!

उद्धव ठाकरे पोहोचले राऊत यांच्या घरी,कुटुंबीयांना दिला धीर!

मुंबई /-

पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. राऊत यांना अटक झाल्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे.त्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. संजय राऊत यांना अटक झाल्यामुळे शिवसेनेमध्ये संतापाचे वातावरण आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन ईडीच्या कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त केला होता. आज उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या भांडुप येथील घरी जाऊन राऊत कुटुंबीयांची भेट घेतली.

यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना आमदार रवींद्र वायकर उपस्थित होते. ईडीने रविवारी राऊत यांच्या घरावर छापा टाकला होता. तब्बल 9 तास झाडाझडती केल्यानंतर राऊत यांना संध्याकाळी ईडी कार्यालयात घेऊन गेली होती. ईडीच्या कारवाईमुळे राऊत कुटुंबीय तणावाखाली होते.आज उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांना धीर दिला. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे कार्यकर्ते हे राऊत यांच्या घराबाहेर जमले होते. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा