परुळे /-शंकर घोगळे
वेंगुर्ले तालुक्यातील विद्या प्रसारक विश्वस्त मंडळ परुळे संचलित अण्णासाहेब देसाई विद्या मंदिर परुळे या माध्यमिक शाळेमध्ये ‘डॉक्टर जगदीश सामंत आदर्श डॉक्टर पुरस्कार’ मिळाल्याबद्दल परुळ्याचे ज्येष्ठ व लोकप्रिय डॉक्टर उमाकांत सामंत यांचा संस्था तसेच प्रशालेतर्फे सत्कार करण्यात आला. डॉक्टर उमाकांत सामंत हे परुळ्याचे लोकप्रिय डॉक्टर असून ते विद्या प्रसारक विश्वस्त मंडळ परुळे या शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. कुष्ठरोग निर्मूलनासाठी आजन्म प्रयत्न करणारे जागतिक कीर्तीचे सुप्रसिद्ध डॉक्टर जगदीश सामंत, अर्नाळा-गोरेगाव यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पहिला ‘डॉक्टर जगदीश सामंत आदर्श डॉक्टर पुरस्कार’ त्यांनीच स्थापन केलेल्या लोकनायक जयप्रकाश नारायण कुष्ठरोग निर्मूलन संस्था अर्नाळा आणि महालक्ष्मी हॉस्पिटल अर्नाळा येथे एका दिमाखदार सोहळ्यात दिनांक 10 एप्रिल 2022 रोजी प्रदान करण्यात आला. पद्म पुरस्कार किंवा धन्वंतरी पुरस्काराच्या समकक्ष असणारा हा पुरस्कार परुळेतील डॉक्टर उमाकांत सामंत यांना मिळणे, हे आपल्या जिल्ह्यासाठी, परुळे गावासाठी व संस्थेसाठी अभिमानास्पद व भूषणावह आहे आणि म्हणूनच अण्णासाहेब देसाई विद्या मंदिर परुळे येथे एका कार्यक्रमांमध्ये डॉक्टर उमाकांत सामंत यांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.
आपल्या सत्काराला उत्तर देताना डॉक्टर उमाकांत सामंत म्हणाले की, “ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जात आहे ते डॉक्टर जगदीश सामंत, हे माझे गुरु होत. त्यांचाच परिसस्पर्श मला लाभला आहे. “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा होय”, हा संस्कार त्यांनीच माझ्यावर केला आहे. अविरत रुग्णसेवेचा वसा मी त्यांच्याकडूनच घेतला आहे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोगवे गावचे माजी सरपंच श्री महेश सामंत उपस्थित होते. ते आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, “डॉक्टर सामंत हे विद्यामंदिर परुळेचे पहिले विद्यार्थी आहेत आणि आज ते संस्थेचे उपाध्यक्ष आहेत.डॉक्टरी शिक्षण घेऊन शहरात न जाता परुळ्यातच राहून त्यांनी मानव सेवा केली आणि आपल्या जन्मभूमीचे ऋण फेडले. आपल्या गुरुच्याच नावे दिला जाणारा पुरस्कार त्यांना मिळणे हे लक्षवेधी आणि प्रशंसनीय आहे. त्यांच्यासारख्या योग्य व्यक्तीस हा पुरस्कार मिळाल्यामुळे त्या पुरस्काराचे सुद्धा महत्त्व वाढले आहे. परुळे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी निश्चितच डॉक्टर उमाकांत सामंत यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे.”
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री मोहनराव देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश देसाई, भोगवे गावचे सरपंच रुपेश मुंडये, चेतन सामंत, अरुणा सामंत, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक सचिन माने यांनी केले. कार्यक्रमाचे निवेदन प्रभू पंचलिंग यांनी तर आभार अमेय देसाई सर यांनी मानले.