मुंबई पालिकेवर भगवा फडकणारच.;शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे.

मुंबई/-

मुंबई पालिकेवर भगवा फडकणारच आहे असा निर्धार व्यक्त करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुकलं आहे. फक्त पालिकाच नाही तर विधानसभेच्या निवडणुकाही लवकरात लवकर घ्याव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे.पक्षातील बंडखोरी आणि अनपेक्षित सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे व्यक्त झाले आहेत. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे.

“मुंबई पालिका निवडणुका लवकर जाहीर झाल्या पाहिजेत. मुंबई पालिकेवर भगवा फडकणारच आहे. अनेकांनी या निवडणुकीनंतर शिवसेना राहणार नाही असं म्हटलं होतं. पण आता मुंबईत मुंबईकर म्हणून सगळे एकत्र झाले आहेत. त्यावेळी यांनी हिंदुत्वात मराठी, अमराठी म्हणत फोडण्याचा प्रयत्न केला होता. तेदेखील आता मला येऊन भेटत आहेत. मराठी माणसांमध्येही फूट पाडण्याचा प्रयत्न केला होता, आजसुद्धा करत आहेत, तेही एकवटले आहेत. तमाम मुंबईकर आज निवडणुकांची वाट पाहत आहेत. फक्त पालिकाच नाही तर विधानसभेच्या निवडणुकाही लवकरात लवकर घ्याव्यात,” असं मत उद्धव ठाकरेंनी मांडलं आहे.

“महाराष्ट्रात आणि मुंबईतही जागा देणार नसाल तर युतीला अर्थ काय?”

“युती झाली तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी तुम्ही देश सांभाळा, मी महाराष्ट्र सांभाळतो म्हटलं होतं. पण तुम्ही देशात तर पसरु देत नाही. दिल्लीत लाल किल्ल्यावर जाऊन भाषण करण्याची आपली इच्छा नाही. पण निदान महाराष्ट्रात आणि मुंबईतही जागा देणार नसाल तर युतीला अर्थ काय?,” अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.

”मुंबईचा घात करण्याची योजना”

मुंबईचा घात करण्याची योजना दिसत आहे का? तसंच मुंबईवर शिवसेनेचा जो पगडा आहे तो मिटवण्याचा प्रयत्न होत आहे का? असं विचारण्यात आलं असता उद्धव ठाकरे म्हणाले “त्यांना तो ठसा पुसायचा आहे. घात नक्कीच होऊ शकतो आणि हे त्यांचं जुनं स्वप्न आहे. जसा रावणाचा जीव बेंबीत, तसा या राज्यकर्त्यांचा जीव मुंबईत आहे. दिल्ली मिळाली तरी मुंबई पाहिजे असा विचित्र प्रकार आहे”.

“मी ऑगस्टमध्ये दौरा करणार”

“राज्यातील वातावरण ढवळून निघत आहे. आदित्यच्या दौऱ्याला प्रचंड गर्दी उसळत आहे. यांना धडा शिकवायचा हीच चर्चा आहे. मी ऑगस्टमध्ये बाहेर पडणार आहे. गेल्या आठवड्यात मी जिल्हाप्रमुखांना काही सूचना केल्या आहेत. जास्तीत जास्त सदस्य नोंदणी, सक्रीय कार्यकर्त्यांची नोंदणी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. जेव्हा मी राज्यात फिरु लागेन तेव्हा सगळे नेते माझ्यासोबत फिरतील. त्या दौऱ्यात येण्यासाठी ही कामं सोडावी लागतील म्हणून थांबलो आहे,” अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.

“पर्यावरणाचा घात होईल असं काही करु नका”

“सरकारकडून निर्णयांना स्थगिती देण्याची घाई सुरु आहे. आरे कारशेडच्या निर्णयानंतर माझ्यावरचा राग मुंबईवर काढू नका असं वारंवार मी सांगत आहे. पर्यावरणाचा घात होईल असं काही करु नका. तिकडे झाडांची कत्तल केल्यानंतररही बिबट्यांचा वावर आहे. त्याचा रिपोर्ट माझ्या घरी टेबलावर आहे, तिथे वन्यजीव आहेत. कांजूरच्या ओसाड जागेत केलं तर हीच मेट्रो अधिक लोकसंख्येसाठी वापरता येईल. आज किंवा उद्या यांना कांजूरमध्ये जावं लागणारच आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

“तुमच्या हट्टापायी मुंबईचा घात करु नका”

“आरेमध्ये कारशेड करताना कोर्टात प्रतिज्ञापत्र दिलं असून एवढी जागा वापरणार नाही सांगितलं आहे. पण त्यांना ही जागा वापरावीच लागणार आहे. केवळ तुमच्या हट्टापायी मुंबईचा घात करु नका. मग हे मुंबईच्या बाहेरचे असल्याने यांना मुंबईबद्दल प्रेम नाही असं म्हणावं लागेल. मुख्यमंत्री महाराष्ट्राचा असतो, तो केवळ मुंबई, ठाणे किंवा नागपूरचा नसतो. मी मुख्यंत्री असताना जिथे शक्य आहे, तिथे वनं वाढवली आहेत याचं समाधान आहे. मुंबईत ८०० एकर जंगल घोषित केलं आहे,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page