“कोकण मराठी साहित्य परिषद मालवणचे सर्वच सोहळे ‘साहित्यिक व्यासंगाचा वारसा’ जपणारे असतात. “सिंधुसाहित्य सरिता” ह्या साहित्यिक उपक्रमाने प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या सिंधुदुर्गातील लेखकांचा परिचय मराठी मनाला होईल ह्या कामाचा शुभारंभ साहित्य रसिक अशा “बॅ. नाथ पै जयंती” दिवशी माझ्या हस्ते होत आहे याचा मला अभिमान वाटतो.असे गौरवोद्गार कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण यांनी आयोजित केलेल्या “सिंधुसाहित्य सरिता” ह्या लेखमालेचे उद्घाटन करताना गझलभूषण मधुसुदन नानिवडेकर यांनी काढले.

सिंधुदुर्गातील जे साहित्यिक सुप्रसिद्ध असूनही महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहचू शकले नाहीत, अशा वीस निवडक साहित्यिकांना पहिल्या मालिकेत स्थान देण्यात आले आहे. यात साहित्यिक आ.सो.शेवरे, वसंत आपटे, प्रतिभा आचरेकर, पा. ना.मिसाळ, ल.मो.बांदेकर, डॉ. विद्याधर करंदिकर, आ.द. राणे, जी. टी. गावकर, विद्याधर भागवत, विजय चिंदरकर, आ. ना. पेडणेकर, श्रीपाद काळे, बाळकृष्ण प्रभुदेसाई, वसंत सावंत, परशुराम देसाई, लुई फर्नांडिस, हरिहर आठलेकर, वसंतराव म्हापणकर, जनयुगकार खांडाळेकर, महामहोपाध्याय वा. वि. मिराशी आदी साहित्यिकांवर कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा मालवणचे आजीव सदस्य लेखन करणार आहेत. त्यात अनुक्रमे कल्पना मलये, उज्ज्वला धानजी, शितल पोकळे, ऋतुजा केळकर, सुजाता टिकले, माधव गावकर, श्रद्धा वाळके, सुगंधा गुरव, वैजयंती करंदिकर, तेजल ताम्हणकर, शिवराज सावंत, मधुरा माणगावकर, उज्ज्वला सामंत, उमेश कोदे, सदानंद कांबळी आणि सुरेश ठाकूर हे लेखन करणार आहेत.

सदर कार्यक्रमाच्या आयोजनासंबंधी बोलताना सुरेश शामराव ठाकूर (अध्यक्ष कोमसाप शाखा-मालवण) म्हणले, *“आज बॅ. नाथ पै जयंती आहे. बॅ. नाथ पै हे साहित्याचे खरे भोक्ते होते. सिंधुदुर्गातील साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, मंगेश पाडगावकर, चिं.त्र्य, खानोलकर आदी अनेकांबाबत त्यांना सार्थ अभिमान होता. ७ नोव्हेंबर १९७० रोजी महाबळेश्वर येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. त्यांच्या जन्मदिनी सुरु होणारी ही लेखमालिका त्यांच्या साहित्यिक रसिकतेला उजाळा देणारी ठरेल

सदर सोहळ्याला ज्येष्ठ मालवणी कवी आणि केंद्रीय कोमसाप समिती सदस्य श्री. रुजारिओ पिंटो यांनी शुभेच्छा दिल्या. सदर लेखमालिका कोमसाप मालवण व्हॉट्स अप ग्रुप मार्फत २६ सप्टेंबर २०२० पासून १५ ऑक्टोबर २०२०पर्यंत प्रकाशित केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page