सिंधदुर्ग जिल्ह्यातील ट्रक, टेम्पो चालक मालकांचा ओसरगाव टोलनाक्यावरोधात आक्रमक..

सिंधुदुर्ग /-

कणकवली : सिंधुदुर्गातील सर्व वाहनांना ओसरगाव टोलनाक्यावर टोल मुभा मिळायलाच हवी.ओसरगाव टोलनाक्यावर सिंधुदुर्गातील वाहनांकडून टोलवसुली करायचा प्रयत्न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील ट्रकचालक मालक तसेच टेम्पो चालकमालक संघटनेच्या सभासदांसह टोलनाक्यावर आंदोलन करणार. जबरदस्तीने सिंधुदुर्गातील वाहनांकडून टोलवसुली केल्यास ओसरगाव टोलनाक्यावर जनतेसाठी प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकर्ते तोडफोड करणारच असा सज्जड दम वजा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी दिला आहे. ओसरगाव टोलनाक्याविरोधात पक्षविरहित टोलविरोधी कृती समिती उभारण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ.ओसरगाव टोलनाक्याची टोल धाड हटविण्यासाठी जनआंदोलन गरजेचे आहे. ओसरगाव टोलनाक्याचा फटका हा सर्वाधिक कणकवली, वैभववाडी, देवगड तालुक्यातील वाहनधारकांना बसणार आहे.ओरोस हे जिल्हा मुख्यालय आणि तिथेच जिल्ह्याचे सिव्हिल हॉस्पिटल आहे. जिल्हा मुख्यालय असल्यामुळे प्रशासकीय कामांसाठी नेहमीच ओरोसला ये जा करावी लागते.तसेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांना दाखल करणे, वैद्यकीय उपचार घेणे यासाठी ओरोसलाच जावे लागते.ओसरगाव टोलनाक्यामुळे या तिन्ही तालुक्यांतील जनतेला नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. अडीच वर्षांपूर्वी हॉटेल हॉर्नबिल मधील पत्रकार परिषदेत ओसरगाव टोलनाका हटवणे आणि तो जिल्ह्याच्या सीमेवर नेण्यासाठी सर्वप्रथम आपणच आवाज उठवला होता याचीही आठवण पिळणकर यांनी करून दिली. मात्र त्यावेळी आपल्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम म्हणून हा टोल राक्षस सिंधुदुर्ग वासीयांच्या मानगुटीवर बसणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना आम्ही आमचा आणि जनतेच्या मनात असलेला संताप कळवला असून ओसरगाव टोलनाक्याविरोधातील जनतेच्या हक्काच्या मागणीसाठी पक्ष वरिष्ठांनी आमच्या भूमिकेला हिरवा कंदील दिला आहे.सिंधुदुर्गात MH 07 पासिंग व्यतिरिक्त अन्य जिल्ह्यातील खरेदी केलेल्या गाड्यांची संख्या अधिक आहे.अशा सर्व गाड्यांना गाडी मालकाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आधारकार्ड हा पुरावा मानून टोलमाफी मिळायला हवी. त्यामुळे आता ओसरगाव टोलनाक्यावर सिंधुदुर्गातील सर्व गाड्यांचा टोल माफ केल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस स्वस्थ बसणार नाही अशी रोखठोक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page