कुडाळ /-
कुडाळ तालुक्यातील कसाल राणेवाडी बस थांबा येथे एसटीतून उतरलेल्या प्रवाशाचा तोल जावून तो एसटी खाली आल्याने झालेल्या अपघात प्रवासी जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी घडली. किरण वसंत हिर्लेकर (वय ४५) रा. कसाल असे दुर्दैवी निधन झालेल्या प्रवाशाचे नाव आहे.
कणकवली बस स्थानकातून सुटणारी कणकवली – बेळगाव ही एमएच 20 बीएल 2132 एसटी बस कणकवली बस स्थानकातून सकाळी 10 वाजून 15 मिनिटांनी सुटली. या बस मधून कसाल येथील प्रवासी किरण वसंत हिर्लेकर (वय 45) हे प्रवास करीत होते. कसाल राणेवाडी येथे बस थांबा आल्यावर बस त्या ठिकाणी थांबली.
यावेळी याच बसने प्रवास करणारे किरण हिर्लेकर हे प्रवासी तेथे उतरले. त्यानंतर गाडी मार्गस्थ झाली व अचानक प्रवासी किरण हिर्लेकर यांचा तोल जावून ते एसटीच्या मागील चाकाखाली पडले. यावेळी त्याच्या डोक्यावरून एसटीचे चाक गेल्याने त्यांचे जागीच निधन झाले. त्यानंतर त्यांची ओळख पोलिसांनी सुरू केली असता प्रवासी कसाल येथीलच रहिवाशी असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या बहिणीने व चुलत भाऊ यांनी तसे पोलीस अधिकारी यांनी सांगितले.
मयत किरण हिर्लेकर हे कसाल ढोकमवाडी येथील रहिवासी असून ते कणकवली येथे वॉशिंग सर्विसिंग सेंटर मध्ये रोजंदारीवर काम करत होते. यांचे लग्न झाले असून पत्नी, आई, वडील, बहीण, असा परिवार आहे. याबाबत अधिक तपास सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र देवरे करत आहेत. अपघात घडल्यानंतर वाहतूक महामार्ग पोलिस मदत कसाल केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण जाधव यांची टीम तत्काळ तेथे पोहोचत वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते व माजी पंचायत समिती सदस्य राजन परब, आदीसह कसाल रहिवाशी मित्र परिवाराने पोलीस कर्मचारी यांना सहकार्य केले..