You are currently viewing आदर्श विद्यार्थी घडविणाऱ्या वजराट शाळेकडे शासन कधी लक्ष पुरविणार ? 

आदर्श विद्यार्थी घडविणाऱ्या वजराट शाळेकडे शासन कधी लक्ष पुरविणार ? 

वेंगुर्ला /-

       वेंगुर्ले तालुक्यातील  जि.प.पूर्ण प्राथमिक वजराट शाळा नं.१ च्या वर्गखोल्यांची छप्पर दुरुस्ती करणे अत्यावश्यक असून ती त्वरित करण्यात यावी,अशी मागणी वजराट सरपंच व येथील ग्रामस्थांनी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.तसेच जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचीही भेट घेऊन छप्पर दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे.यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई,वेंगुर्ले भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,तालुका चिटणीस नितीन चव्हाण,वामन भोसले आदी ग्रामस्थ उपस्थित होते.वजराट शाळा नं.१ ही तालुक्यातील एक अग्रेसर शाळा असून येथील शिक्षक तसेच विद्यार्थी हे विविध स्पर्धांमध्ये जिल्ह्यात अग्रेसर असतात.परंतु या शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने शासनाची उदासीनता असल्याचे दिसून येते,असे ग्रामस्थांनी सांगितले.या शाळेमध्ये एकूण ७९ मुले शिक्षण घेत असून उन्हाळी सुट्टीनंतर १३ जून रोजी शाळा सुरु होणार आहे.येथे एकूण ७ वर्ग असून एकूण २ रुमचे छप्पर पूर्णपणे नादुरुस्त झाले असून इतर छप्परांची दुरुस्ती अत्यावश्यक आहे. सध्या “टेकू” लावलेल्या मोडकळीस आलेल्या या स्थितीची व या गंभीर बाबीकडे त्वरित वरिष्ठ स्तरावरुन पाहणी होऊन पावसाळी हंगामापूर्वी दुरुस्ती करणे आवश्यक आहे.याबाबत सरपंच महेश राणे,उपसरपंच नितीन परब,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजन परब व अन्य ग्रामस्थ यांनीही माजी जि.प.अध्यक्षा संजना सावंत यांचेही लक्ष वेधले होते.गेले ६ महिने याबाबत पाठपुरावा सुरु आहे.शाळेकडूनही तालुकास्तरावर ३ वेळा दुरुस्ती प्रस्ताव पाठविण्यात आले असून वारंवार पाठपुरावाही सुरु आहे.सन २०१९-२०, २०२०-२१ च्या दुरुस्ती आराखड्यात या शाळेचा समावेश होता.मात्र येथील परिस्थिती गंभीर स्वरुपाची असूनही याकडे दुर्लक्ष का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.याबाबत  गटशिक्षणाधिकारी यांनी अग्रक्रमाने लक्ष पुरविणे आवश्यक आहे, असे नितीन चव्हाण यांनी सांगितले. पावसाळ्यात येथे छप्पर तुटून गंभीर घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण ? याबाबत वारंवार पाठपुरावा करुनही शासनाचे व संबंधित विभागाचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने वरिष्ठ स्तरावरुन त्वरित पाहणी होऊन छप्पर दुरुस्ती करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली आहे.

अभिप्राय द्या..