कणकवली /-

विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून शालेय अभ्यासक्रमाच्या परिघाबाहेर विद्यार्थी आणि पर्यायाने समाज घडविणारे शिक्षक खऱ्या अर्थाने आदर्श शिक्षक असतात. याच भावनेतून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात चौफेर कार्यरत असणाऱ्या सरिता पवार यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार पुरस्काराने सन्मानीत करण्यात येत असल्याचे प्रतिपादन नागसेन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. नागेश कदम यांनी केले. नागसेन शिक्षण प्रसारक शिक्षण मंडळाच्या वतीने देण्यात येणार राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार कणकवली तालुक्यातील जि.प शाळा माईण नं 1 च्या सहाय्यक शिक्षिका सरिता पवार यांना संस्थाध्यक्ष प्रा. नागेश कदम यांच्या हस्ते इतिहास संशोधक प्रा. डॉ. सोमनाथ कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत एस डी.पेडणेकर इंग्लिश मिडीयम स्कुल लोरे नं 2 च्या प्रांगणात शानदार कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सव नागसेन शिक्षण प्रसारक मंडळ डोंबिवली च्या वतीने एस.डी.पेडणेकर इंग्लिश मिडीयम स्कुल लोरे नं 2 येथे साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना प्रा.डॉ. सोमनाथ कदम म्हणाले की छत्रपतींनी शिवकाळात रयतेला स्वराज्य निर्माण करून दिले. तर भारतीय घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान बनवून देशाला सुराज्याचा मार्ग दाखवला. सरिता पवार यांना दिलेला आदर्श शिक्षिका पुरस्कार हा त्यांच्या आजवरच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान आहे. सत्कारमूर्ती सरिता पवार यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की शिक्षकी पेशात काम करताना सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक अशा विविध आघाड्यांवर स्वतःची नाममुद्रा उमटविणाऱ्या शिक्षिकेला पुरस्काराने नागसेन शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात येते. रुळलेल्या वाटा सोडून स्वतःची पायवाट निर्माण करणाऱ्या त्यासाठी खडतर रस्त्यांशी मैत्री करणाऱ्या सावित्रीच्या लेकींचा नागसेन शिक्षण संस्था गौरव करते. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून त्यांची वाटचाल योग्य दिशेने चालू असल्याचा विश्वास देते . समाजभान जपण्याचे आणि जोपासण्याचे बाळकडू आई आणि वडिलांकडून बालपणापासून मिळाले. दगडातील देव शोधण्यापेक्षा माणसातील देव शोधण्याची दृष्टी आईवडीलांनी दिली. विद्यार्थी हाच पुरस्कार मानून आदर्श पिढी घडवणाऱ्या शिक्षकांना मिळालेल्या पुरस्कारातून आणखी सकारात्मक कार्य करण्याची ऊर्जा मिळते. यावेळी
नागसेन शिक्षण प्रसारक संस्थेचे पदाधिकारी डॉ.रश्मी येराडकर, प्रा. अनंत उतेकर (आर.एस.पी अधिकारी) शाळेचे मुख्याध्यापक निरंजन जाधव, नृत्य परीक्षक आनंद ताबे, गावचे पोलीस पाटील राणे, दीप्ती पेडणेकर, किशोर कदम, पत्रकार राजन चव्हाण ,शुभांगी पवार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page