वेंगुर्ला /-

वेंगुर्ले :-जुलै 2020 रोजी झालेल्या अतिवृष्टीमध्ये केळुस-कालवीबंदर   रस्त्यावरील दाडोबा देवस्थान नजीक असलेली मोरी पूर्णपणे खचून धोकादायक बनलेला रस्ता येत्या पावसाळ्यात वाहून जाऊन कालवीबंदरवाडीचा संपर्क तुटण्याची शक्यता असल्याने संबधित सर्व खात्यांकडे पाठपुरावा करूनही त्याची दखल न घेतल्याने येत्या 15 दिवसांत रस्त्याच्या ठिकाणची संरक्षक भिंत व मोरीचे काम न झाल्यास 22 एप्रिलला  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्यायासाठी उपोषण करण्यात येत असल्याचे लेखी निवेदन केळुस ग्रामपंचायतीचे उपसरपंच व पत्रकार कृष्णा उर्फ आबा नारायण खवणेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे.

कालवी तिठा ते कालवीबंदर या रस्त्यावर तळी–बोवलेवाडी जवळ असलेल्या श्री देव दाडोबा देवस्थान लगत असलेली संरक्षिक भिंत  12 जुलै 2020 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे कोसळून पडली आहे. सदर रस्ता कालवीबंदर समुद्र किनाऱ्यावर जात असल्याने मोठया प्रमाणात माणसांची ये-जा असून, मोरी खचल्यामुळे पुढे पडणाऱ्या वादळी पावसात  कालवीबंदर वाडीचा संपर्क तुटू शकतो तसेच कालवीबंदर येथे मच्छीमार वस्ती मोठया प्रमाणात आहे. सदर रस्त्यावरुन वेंगुर्ले व कुडाळ वरुन ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्याही मोठया प्रमाणात आहे. तसेच रिक्षा व वाहनांची मोठया प्रमाणात वर्दळ असते. तर प्रवाशांना व शेतकरी वर्गालाही त्याचा त्रास होत आहे. तसेच पावसाळय़ाच्या कालावधीमध्ये सदर मोरीवर पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने व वाहतुकीला एकच मार्ग आहे. तसेच सध्या या ठिकाणी मोरी जवळील रस्ताही खचत चाललेला आहे. याबाबत 21 जुलै 2020 रोजी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, जिल्हा परीषद अध्‍यक्ष सिंधुदुर्ग, कार्यकारी अभियंता जिल्हा परीषद बांधकाम विभाग सिंधुदुर्ग, जिल्हा परीषद बांधकाम उपविभाग वेंगुर्ले, बांधकाम सभापती सिंधुदुर्ग यांना याबाबत निवेदने देण्यात आली होती. तर याबाबत वृत्तपत्रात व सोशल मिडीयावर सुध्दा आवाज उठविण्यात आला होता. यावेळी तातडीने जिल्हा परीषद अध्यक्षा समीधा नाईक यांनी येवून प्रत्यक्ष पाहणी केली होती. यावेळी बांधकाम खात्याचे अधिकारी सुध्दा उपस्थित होते. कुठल्याहि परीस्थितीत 2021 मध्ये याठिकाणी रस्त्यावरील पुल (मोरी) व संरक्षण भिंत  बांधण्याचे आश्वासन ग्रामस्थांना व आम्हाला ‍ दिले. मात्र दीड वर्षे होत झाले तरी या ठिकाणी शासकीय स्तरावरुन कोणत्याही हालचाली अजून पर्यंत केल्या नसल्याने येत्या पावसाळय़ाच्या कालावधीमध्ये सदर मोरी पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने कालवीबंदर वाडीचा संपर्क तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

केळूस कालवीबंदर हा रस्ता जिल्हा परीषद, सिंधुदुर्गच्या मालकीचा आहे. असे असताना याबाबत आजपर्यत पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने, येत्या 15 दिवसात केळूस कालवीबंदर रस्त्यावरील अतिवृष्टीमध्‍ये खचलेल्या मोरीची व संरक्षण भिंतीची तातडीने दखल न घेतल्यास 22 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे उपोषणाला बसणार आहे याची कृपया नोंद घ्यावी. असे केळुस ग्रामपंचायतीचे उपसरपंच व पत्रकार कृष्णा उर्फ आबा नारायण खवणेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनांत नमुद केले आहे.
या निवेदनाच्या प्रती आमदार दिपक केसरकर, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, सिंधुदुर्ग जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी,  सिंधुदुर्गच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, सिंधुदुर्ग जिल्हा पाfरषद, आमदार वैभव नाईक, जिल्हा परीषद बांधकाम उपविभाग, वेंगुर्ले, वेंगुर्ले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसअधिक्षक, वेंगुर्ले  तहसिलदार साहेब, वेंगुर्ले पोलिस निरिक्षक, निवती पोलिस निरीक्षक यांना देण्यांत आल्या आहेत.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page