You are currently viewing गडनदीत बुडालेल्या सुजल परुळेकरचा मृतदेह सापडला

गडनदीत बुडालेल्या सुजल परुळेकरचा मृतदेह सापडला

कणकवली /-

कणकवली गडनदीवरील बागदे गावाजवळील बाघाचा वाफा येथील डोहातील पाण्यात सुजल अशोक परूळेकर (१८, रा. वायंगवडे, मालवण) हा युवक बुडाला होता. रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. मित्रांसमवेत आंघोळीसाठी गेला असताना नदीपात्राचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला होता. सोमवारी सकाळी ११.४० वाजण्याच्या सुमारास तब्बल अठरा तासांनंतर त्याचा मृतदेह सापडला.

मालवण तालुक्यातील बायंगवडे गावातील सुजल परूळेकर व त्याचा मोठा भाऊ आदित्य परूळेकर हे कणकवलीतील एका हॉटेलमध्ये कामाला आहेत. हॉटेलमधील कामाची वेळ संपल्यानंतर रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास सुजल हा मित्रांसमवेत बागदे गावातील गडनदीच्या बाघाचा बाफा येथील डोहाजवळ गेला होता. सर्व मित्र खुबे काढत असताना सुजल हा काहीसा पाण्यात पुढे गेला. तो पाण्यात बुडू लागल्याने त्याने वाचविण्यासाठी आरडाओरडा केला. मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र, तोपर्यंत तो पाण्यात दिसेनासा झाला होता.

मित्रांनी तत्काळ या घटनेची माहिती हेल्पलाईनवर संपर्क करून दिली. त्यानंतर कणकवली पोलिसांनाही माहिती देण्यात आली. गडनदीच्या पात्रात युवक बुडाल्याचे समजल्यानंतर कणकवलीचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर, पोलिस हवालदार पांडुरंग पांढरे, उबाळे, बागदे पोलिस पाटील सुनील कदम यांच्यासह हॉटेलचे मालक व सुजलचे मित्र व भाऊ हे घटनास्थळी पोहोचले. दोरीच्या सहाय्याने नदीपात्रात उतरून काही तरुणांनी सुजल याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण तो सापडू शकला नाही. त्यामुळे आज, सोमवारी सकाळी करूळ येथील अकरा जणांच्या घोरपी बांधवांच्या टीमने पुन्हा नदीपात्रात शोध मोहिम राबदिली. त्यावेळी सुजलचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह नेण्यात आला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक हाडळ, हवालदार गुरव, दत्ता सावंत, किरण मैथे, सुप्रिया भागवत आदी पोलिसांचे प्रथक उपस्थित होते.

अभिप्राय द्या..