वेंगुर्ला /-

महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२१- २२ मध्ये वेंगुर्ले तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दाभोली नं. २ चे उपक्रमशील पदवीधर शिक्षक प्रशांत भालचंद्र चिपकर यांनी ‘राज्यात पाचवा क्रमांक’ पटकाविला आहे.त्यांच्या विशेष अशा नवोपक्रमास ‘राज्यात पाचवा क्रमांक’ प्राप्त झाला असून याबाबत त्यांचे शैक्षणिक तसेच सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.महाराष्ट्र शासनाच्या संशोधन विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत सदर नवोपक्रम स्पर्धा दरवर्षी विविध पाच गटांमध्ये आयोजित करण्यात येते.महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचा अंतिम निकाल व पारितोषिक वितरण कार्यक्रम दि.१५ मार्च २०२२ रोजी एस.सी. ई. आर. टी., महाराष्ट्र ,पुणे येथील महात्मा फुले सभागृहात पार पडला.यात ‘प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक’ या सर्वाधिक स्पर्धक नोंद झालेल्या गटातून वेंगुर्ले तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा दाभोली नं. २  या शाळेतील उपक्रमशील पदवीधर शिक्षक  प्रशांत भालचंद्र चिपकर यांच्या ‘ गणित विषयाच्या संपादणूक वृद्धीचा घेतला ध्यास , स्वनिर्मित युट्युब व्हिडीओ उपाय ठरला खास’ या नवोपक्रमास ‘राज्यात पाचवा क्रमांक’ प्राप्त झाला आहे.याबाबत त्यांना संचालक एम. डी. सिंग (आयएएस) यांच्या हस्ते व राज्य समन्वयक विकास गरड आणि संशोधन विभाग प्रमुख डॉ. अमोल डोंबाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ ह. ना. जगताप हे उपस्थित होते.एकूण ६९७ स्पर्धकांमधून जिल्हा व राज्य स्तरावर प्रत्येकी दोन फेऱ्यांमध्ये पात्रता सिद्ध केल्यावर अंतिम १५० हून अधिक पात्र शिक्षकांमधून पाच गटातून सर्वोत्तम प्रत्येकी पाच स्पर्धकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.मागील दोन वर्षांमध्ये कोरोना प्रादुर्भाव काळात विद्यार्थ्यांचे अध्ययन अखंडपणे सुरु रहावे, यासाठी प्रशांत चिपकर यांनी ऑनलाईन व ऑफलाईन अशा माध्यमातून ऑनलाईन चाचण्या, गृहभेटी, शाळेबाहेरची शाळा, ऑनलाईन अध्यापन व चर्चासत्रे असे विविध उपक्रम राबविले. युट्युब चॅनलच्या माध्यमातूनही त्यांनी विद्यार्थ्यांना गणिताचे अनेक घटक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले व आपले शैक्षणिक कार्य यशस्वीपणे पार पाडले. त्यांनी राबवलेल्या या नवोपक्रमाद्वारे इयत्ता सातवीच्या गणित विषयातील विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर गणित विषयाच्या स्वनिर्मित युट्युब व्हिडीओची निर्मिती केली. त्यांचे प्रसारण करून त्यावर आधारित चाचण्या विकसित केल्या आणि विद्यार्थ्यांची गणित विषयातील संपादणूक वृद्धी घडवून आणली. त्यांच्या या उपक्रमामुळे त्यांच्या शाळेतील तसेच केंद्रस्तर , तालुका आणि जिल्हापातळीवरही अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला.विद्यार्थ्यांचे शिक्षण चिरंतन व्हावे हा उद्देश समोर ठेऊन त्यांनी विविध उपक्रम राबविले.अशा विविध उपक्रमातून तसेच सध्याच्या नवीन तंत्रज्ञानाचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी फायदा करुन घ्यावा व शैक्षणिक प्रगती करावी,असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्राथमिक गटांमध्ये भरीव यश प्राप्त झाल्याने पारितोषिक प्राप्त  शिक्षक प्रशांत भालचंद्र चिपकर यांचे शिक्षणाधिकारी  – प्राथमिक सिंधुदुर्ग महेश धोत्रे, मुश्ताक शेख, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग च्या प्राचार्या अनुपमा तावशीकर,  उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग चे  संशोधन विभाग प्रमुख व मार्गदर्शक डॉ. एल. बी. आचरेकर, वेंगुर्ले तालुका गटशिक्षणाधिकारी तथा शिक्षण विस्तार अधिकारी संतोष गोसावी, केंद्रप्रमुख प्रमोद गावडे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका रेश्मा मराठे, दाभोली ग्रामपंचायत सरपंच उदय गोवेकर, दाभोली ग्रामसेवक एस.पी.पिंगुळकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोपाळ दाभोलकर , ज्येष्ठ शिक्षणतज्ञ गुरुनाथ जोशी, तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, माता पालक संघ सदस्य व पालक, विद्यार्थी यांनी चिपकर यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page