मालवण /
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या परीक्षेतील निकालाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा उजेडात आला आहे. फेब्रुवारी मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत मालवणच्या भंडारी ए. सो. ज्युनिअर कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा निकाल त्यांनी कोकण मंडळाकडे दाखल केलेल्या पुनर्मुल्यांकन प्रक्रियेत बदलला आहे. बोर्डाच्या निकालात अनुत्तीर्ण झालेला या ज्युनिअर कॉलेजचा हर्षल वराडकर हा विद्यार्थी चक्क उत्तीर्ण झाला आहे तर तेजस्वीनी रामचंद्र माळकर या विद्यार्थिनीच्या अर्थशास्त्र विषयात दहा गुणांनी वाढ झाल्याने ती मालवण तालुक्यात द्वितीय आणि वाणिज्य विभागात प्रथम आली आहे. विशेष म्हणजे निकालातील या बदलामुळे मालवणच्या भंडारी ज्युनिअर कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे.
फेब्रुवारी मार्च २०२० मध्ये कोकण बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परिक्षेचा निकाल जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात आला होता. या परीक्षेत मालवणच्या भंडारी ए. सो. ज्युनिअर कॉलेजचा निकाल ९९.२० टक्के लागला होता. या परीक्षेत १२५ विद्यार्थ्यांपैकी १२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. या ज्युनिअर कॉलेजचा कला शाखेचा विद्यार्थी हर्षल वराडकर हा इंग्रजी विषयात ३४ गुण मिळाल्याने त्याचा निकाल अनुत्तीर्ण असा आला होता. त्याच प्रमाणे वाणिज्य शाखेत या ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रथम आलेल्या तेजस्वी रामचंद्र माळकर हिला अर्थशास्त्र विषयात ८० गुण मिळाल्याचे बोर्डाने निकाल पत्रात दर्शविले होते. या निकालाबाबत संबंधित दोन्ही विद्यार्थी साशंक होते. म्हणून या दोन्ही विद्यार्थ्यांनी कोकण बोर्डाकडे पुनर्मुल्यांकनासाठी आपले अर्ज दाखल केले. कोकण बोर्डाने ज्युनिअर कॉलेजला पाठविलेल्या निकाल पत्रात कला शाखेचा विद्यार्थी हर्षल वराडकर हा उत्तीर्ण झाल्याचे कळविले.
वराडकर याच्या इंग्रजी विषयाच्या उत्तर पत्रिकेत दोन गुणांनी वाढ झाल्याने त्याला इंग्रजीत ३६ गुण मिळाले आहेत. त्यामुळे कला शाखेचा या ज्युनिअर कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे तर वाणिज्य विभागात अर्थशास्त्र विषयामध्ये ८० गुण मिळविणाऱ्या तेजस्विनी माळकर या विद्यार्थीनीच्या गुणात दहा गुणांची वाढ झाल्याने तीला १०० पैकी ९० गुण मिळाले आहेत. यापूर्वी मालवण तालुक्यात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होणारी तेजस्विनी माळकर ही आता निकालातील बदलाने द्वितीय आली आहे. कोकण बोर्डाच्या निकाला बाबतच्या या सावळा गोंधळाचा फटका या विद्यार्थ्यांना बसल्याने त्यांना काही काळ मनस्ताप सहन करावा लागला आहे. दोन्ही विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल भंडारी एज्युकेशन सोसायटी ( मालवण ) मुंबईचे अध्यक्ष विजय पाटकर, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य व्ही. जी. खोत तसेज शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.