सिंधुदुर्गनगरी /-

ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही, प्रथम ओबीसी आरक्षण जाहीर करावे व नंतरच निवडणुका घ्यावात अन्यथा आंदोलन उभे करु असा इशारा सोमवारी सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी महासंघाने पत्रकार परिषदेत दिला. याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांची शिष्टमंडळाने भेट घेत निवेदन सादर केले. ओबीसी नेते काका कुडाळकर व ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंद मेस्त्री यांच्यासह विवीध ओबीसी संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी ही माहीती दिली.
राज्य शासनाने ओबीसी आरक्षणासाठी न्यायालयाकडे तात्काळ इम्पिरिकल डाटा तयार करून सादर करावा कारण जोपर्यंत हा डाटा न्यायालयासमोर जाणार नाही आतापर्यंत ओबीसी आरक्षण मिळणार नाही हे न्यायालयीन निर्णयानंतर उघड झाले आहे. म्हणूनच राज्य सरकारने ही बाब गांभिर्याने घ्यावी. व जोपर्यंत ओबीसी आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत कोणत्याही निवडणुका घेऊ नयेत अशी ओबीसी महासंघाचे आग्रही भूमिका आहे. शासनाने ओबीसी आरक्षणाचा तिढा प्रथम सोडवावा व त्यानंतर निवडणुकीची भूमिका घ्यावी यासाठी ओबीसी महासंघ सातत्याने लढा देणार आहे.असेही या पत्रकार परिषदेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर यांनी स्पष्ट केले.

इम्पिरियल डाटा गोळा करण्यासाठी जर शासन कमी पडत असेल तर त्यांना ओबीसी महासंघ मदत करेल. गावागावात वाड्यावस्त्यांवर जाऊन तशी माहिती गोळा करण्यासाठी आमचा महासंघ मदत करेल असेही काका कुडाळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. हे ओबीसी आरक्षण देण्यासाठी शासनाने खंबीरपणे व जलदगतीने पावले उचलावीत यासाठी ओबीसी महासंघ शासनाच्या कृतीकडे लक्ष ठेवून आहे असेही त्यांनी सांगितले. यावेळी वैश्य समाजाचे जिल्हाध्यक्ष सुनील भोगटे भंडारी समाजाचे जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बाळ कन्याळकर शिवसेना ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रूपेश पावसकर काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष महेश अंधारी भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष दीपक नारकर , सुनील नाईक श्रेया गावकर रूपेश पिंगुळकर अनिल अणावकर चंद्रशेखर चव्हाण जयप्रकाश चमणकर राजू गावंडे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page