You are currently viewing पोलिसांवर मोठा दबाव योग्यवेळी पुरावे सीबीआयकडे देईन, चौकशीदरम्यान नारायण राणेंची माहिती

पोलिसांवर मोठा दबाव योग्यवेळी पुरावे सीबीआयकडे देईन, चौकशीदरम्यान नारायण राणेंची माहिती

मुंबई /-

दिशा सालियनबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्याच्या गुन्ह्याखाली केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला, ज्यानंतर आता मालवणी पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलंं.जवळपास 8 तास नारायण राणे यांची चौकशी चालली. ज्यानंतर राणेंच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांवर मोठा दबाव असून योग्यवेळी पुरावे सीबीआयकडे देईन अशी माहिती चौकशीदरम्यान नारायण राणे यांनी दिली आहे.

👉दिशा सालियन वर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचं वक्तव्य नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत केलं होतं. त्यानंतर तिच्या पालकांनी नारायण राणे आणि नितेश राणेंविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या संदर्भात महिला आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नारायण आणि नितेश राणेंविरोधात मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर आता त्यांची या वक्तव्याप्रकरणी त्यांची आज चौकशी करण्यात आली. यावेळी नारायण राणे यांच्या मते, पोलिसांना दर 10 मिनिटांना फोन येत होते. ज्यातून त्यांच्यावर वरच्या स्तरातून दबाव असल्याचं स्पष्ट होत होतं. त्यामुळे माझ्याकडील पुरावे योग्यवेळी सीबीआयकडे देईन असं यावेळी राणे म्हणाले.

दिशाच्या पालकांची महिला आयोगाकडे धाव

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी दिशा सालियनच्या आई-वडीलांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. राणेंच्या आरोपांमुळे दिवगंत दिशाची नाहक बदनामी होत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. त्यानंतर राज्य महिला आयोगाने मालवणी पोलीस ठाण्याकडून दिशाच्या मृत्यू प्रकरणाचा अहवाल मागितला होता.

मालवणी पोलिसांचा अहवाल काय?

दिशाचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असून तिच्यावर कोणतेही अत्याचार करण्यात आले नव्हते असे अहवालात नमूद करण्यात आले होते. मालवणी पोलिसांच्या अहवालानंतर राज्य महिला आयोगाने नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले.

अभिप्राय द्या..