सावंतवाडी /-
चारचाकी आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात आजरा येथील युवक जखमी झाला आहे. ही घटना आज सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी-आंबोली मार्गावर माडखोल परिसरात घडली. पार्थ दोरुगडे, असे त्याचे नाव आहे. दरम्यान त्याला १०८ रुग्णवाहिकेतून येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की संबंधित युवक आजरा येथून सावंतवाडीच्या दिशेने येत होता. यावेळी समोरून येणाऱ्या चारचाकीची त्याच्या ताब्यातील दुचाकीला जोरदार धडक बसली. यात तो रस्त्यावर फेकला गेला. या अपघातात त्याच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान त्याला १०८ रुग्णवाहिकेतून स्थानिकांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तर या अपघातात दुचाकीचा पूर्णतः चक्काचूर झाला आहे.